विरुर (स्टे.) पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे गोंडपिपरीचा "चार्ज"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:28 AM2021-07-27T04:28:57+5:302021-07-27T04:28:57+5:30
* गोंडपिपरी तालुक्याचा पशुधन विभाग खिळखिळा * रिक्त पदांचे ग्रहण * शेतकर्यांवर संकट * पशुधन धोक्यात पशुधन संकटात : ...
* गोंडपिपरी तालुक्याचा पशुधन विभाग खिळखिळा
* रिक्त पदांचे ग्रहण
* शेतकर्यांवर संकट
* पशुधन धोक्यात
पशुधन संकटात : पशुपालक चिंतेत
गोंडपिपरी : उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्याची मदार शेती आणि शेतमजुरीवर आहे. या तालुक्यात पशुधनांची संख्या अधिक आहे. मात्र, रिक्त पदे आणि प्रभारांमुळे तालुक्यातील पशुधन विभाग पूर्णत: खिळखिळा झाला आहे. असे असताना त्यांच्या असहकार धोरणांमुळे जनावरांमध्ये रोगराईची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी गोंडपिपरी तालुक्यातील बळीराजा आता चिंतेत सापडला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पशुधन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. असे असताना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील पशुधन विकास अधिकारी ताजने यांच्याकडे गोंडपिपरीचा "चार्ज" आहे. त्यांच्या माध्यमातून गोंडपिपरीचा कारभार हाकला जात आहे.
बळीराजाला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे गेले दीड वर्ष बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आला. यातच उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्यात शेती अन शेतमजुरी हा मुख्य व्यवसाय आहे. सोबतच अधूनमधून आर्थिक विवंचनेत सापडत असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे यावे आणि कुटुंबास हातभार लागावा, यासाठी बळीराजाने शेतीसोबत पशुपालन करावे, असे शासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते. शेतकरीदेखील शासनाच्या योजनांचा लाभ घेतो. शेती, शेतमजुरीसोबतच पशुपालन करण्यासाठी धजावतो. अनेक बेरोजगारांनीदेखील आर्थिक संपन्नतेसाठी या व्यवसायात उडी घेतली आहे. मात्र, पशुधन विभागाचे म्हणावे तेवढे सहकार्य होताना दिसत नाही. सध्या शेतीचा हंगाम जोमात आहे. याचवेळी जनावरांना लसीकरणाची गरज आहे. मात्र, ९८ गावखेड्यांचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात बहुतांश गावात जनावरांचे लसीकरण झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फऱ्या, घटसर्प, बुळकांडी, एकटांग्या, आंत्रविचार, तोंडखुरी, पायखुरी आदी जनावरांच्या रोगाविषयी लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र, गोंडपिपरी तालुक्यातील पशुधन विभागातील रिक्त पदे आणि अतिरिक्त प्रभारांमुळे कित्येक जनावरे लसीकरणापासून आजही वंचित आहेत.
260721\img-20200804-wa0006.jpg
कार्यालय,पंचायत समिती,गोंडपिपरी.