फोटो
शंकरपूर : येथील मिरची सातरा लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे येथील मजुरांचा रोजगार हिरावल्याने हे मिरची सातरा सुरू करण्याची मागणी मजूरवर्गाकडून केली जात आहे. त्यासंदर्भात सोमवारी जवळपास शंभर महिला मजूर तलाठी कार्यालयात येऊन धडकल्या होत्या.
शंकरपूर हे गाव दहा हजार लोकवस्तीचे असून, या गावात खूप मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग आहे. मागील दहा वर्षांपासून कायमस्वरूपी दोन मिरची सातरे आहेत. या दोन मिरची सातऱ्यावर जवळपास ७०० ते ८०० मजूर काम करतात. या मिरची सातऱ्यावर हुंडा पद्धतीने काम होत असल्याने मजूरदार वर्गाला मजुरी चांगली मिळत आहे. परंतु या लॉकडाऊनमध्ये मिरची सातरे प्रशासनाने बंद केल्याने या मजुरांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे आता हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती येथील मजूरदारांची असल्याने कामच केलं नाही तर पैसा कुठून येणार, घरी काय खाणार, या गंभीर प्रश्नाने ते चिंतेत आहेत. त्यामुळे येथील जवळपास शंभर महिला मजूर आज मिरची सातरा सुरू करण्यासाठी तलाठी कार्यालय येथे धडकले. परंतु तलाठी कार्यालय बंद असल्याने महिलांनी तिथेच ठाण मांडले होते. ही बाब पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांना माहीत होताच ते तिथे आले आणि त्यांनी स्त्री मजुरांना कोरोनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. तसेच आपण सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशा सूचनाही केल्या. ज्या मजुरांची चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनी मिरची सातरावर काम करावे, अशी सूचनाही त्यांनी स्त्री मजूरवर्गाला केलेली आहे.