चिमूर शहीद दिन सोहळ्याला महिलांची अफाट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:37 AM2019-08-17T00:37:16+5:302019-08-17T00:40:31+5:30
येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे आयोजित केलेल्या चिमूर शहीद स्मृतिदिन सोहळ्याला चिमूर मतदार संघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत अफाट गर्दी केली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजतापासूनच महिला भगिनी चिमुरात दाखल होत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे आयोजित केलेल्या चिमूर शहीद स्मृतिदिन सोहळ्याला चिमूर मतदार संघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत अफाट गर्दी केली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजतापासूनच महिला भगिनी चिमुरात दाखल होत होत्या. आयोजकांनाही कार्यक्रमाच्या तीन-चार तासांपूर्वीपासूनच महिलांना कार्यक्रमस्थळी सुखरूप पोहचण्यासाठी सक्रिय व्हावे लागले. महिलांच्या भव्य गर्दीने आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला मंडप काही क्षणातच महिलांनी खचाखच भरला होता. शिवाय त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक महिला मंडपाच्या बाहेर होत्या. अशातच महिलांचे जत्थे कार्यक्रमस्थळी येणे सुरूच होते.
चिमूर येथे शुक्रवारी दुपारी ३.३९ वाजता शहीद स्मृती दिन सोहळा, स्व.अटल बिहारी वाजपेयी स्मृती दिन व रक्षाबंधन सोहळा अशा तिहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी दिव्यज फॉऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस होत्या. मंचावर स्वागताध्यक्ष माजी आमदार मितेश भांगडिया, चिमूर-गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आयोजक आमदार कीर्तिकुमार भांगडिया, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपचे माजी महामंत्री रवी भुसारी, वसंत वारजूकर, जि. प. सदस्य संजय गजपुरे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिनी अमृता फडणवीस म्हणाल्या, चिमूरला येऊन आपल्याला कमालीचा आनंद झाला. बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी सुरू आहे. हे पाहून आणखी आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या.
दरवर्षी १६ आॅगस्टला शहीद स्मृती दिन सोहळा साजरा करतो. चिमूर विधानसभा मतदारसंघात चौफेर रस्त्याचे काम सुरू आहे. एकही रास्ता आता शिल्लक राहणार नाही. सिंचनाचे मोठे काम या मतदारसंघात प्रथमच होत आहे. पुढील काळात रेल्वे येईल.
एक मोठा उद्योग येईल, अशी माहिती यावेळी माजी आमदार मितेश भांगडिया यांनी दिली. यावेळी खा. अशोक नेते, रवींद्र भुसारी यांचीही भाषणे झाली.
चिमूरचे प्रथम शहीद वीर बालाजी रायपूरकर यांच्या नावाने सभागृहाचे बांधकाम झाले. त्याचे लोकार्पणही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- आ. भांगडिया
गेल्या चार वर्षांपासून चिमूर विधानसभा क्षेत्राचा सेवक म्हणून हा सोहळा साजरा करीत आहे. यानिमित्ताने चिमूरच्या शहिदांना नमन करतो. ही क्रांती जिवंत राहिली पाहिजे. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी. तीच हौतात्मांच्या शौर्याला सलामी ठरेल. हा राजकीय मंच नाही. या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम काही राजकीय मंडळी करीत होती. या मंचावर शाहिदाना नमन करण्यासाठी येतो. राजकारण करण्याचा हा मंच नाही. विरोध करण्यासाठी १६ आॅगस्टच दिसते काय, असा सवालही आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी केला. या क्रांती भूमीची मान खाली झुकणार, असे काम आम्ही करणार नाही. भांगडिया कुटुंबाला सामाजिक दायित्वाचा इतिहास आहे. पुढची पिढीही हा वसा चालविणार यात शंका नाही. येथील जनतेने टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी यावेळी दिली. जन्माला आलेल्या २८०० मुलींच्या नावाने प्रत्येकी पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून सुरू केलेल्या सुकन्या योजनेचा लाभ दिला, असेही आ. भांगडिया म्हणाले.
विरोधकांच्या अफवा आणि भांंगडिया यांचे उत्तर
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, मी जे बोलतो ते करतो. अपेक्षेपेक्षा अधिक भगिनी मला राखी बांधून आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. अशात विरोधकांकडून चेंगराचेंगरीत दोन-तीन महिला मृत्युमुखी पडल्याच्या अफवा पसरवत आहे. येथे आमचे नियोजन चुकले असेल. पण माझ्या प्रत्येक भगिनीला त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची ग्वाही मी देतो, कुणीही विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे कळकळीचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी करतानाच विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला.
अनेकांचा सत्कार
कार्यक्रमाच्या औचित्य साधून श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पाच लाख ११ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आले. अग्निशमनची गाडी व स्टाफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी खा. अशोक नेते यांचा चिमूर विधानसभाच्या वतीने सत्कार, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपचे माजी महामंत्री रवींद्र भुसारी, माजी आमदार मितेश भांगडीया यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जि. प. चंद्रपूरच्या वतीने अमृता फडणवीस यांचाही सत्कार करण्यात आला.