लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाहता पाहता चांगलाच वाढायला लागला आहे. या वर्षात सुरुवातीला आठ-दहा रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. ती आता तीनशेच्या घरात गेली आहे. यावर मात करण्यासाठी दुकानांची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंतची केली आहे. या जिल्हा प्रशासनाच्या अफलातून आदेशाने नागरिकांना हसू की रडू झाले आहे. काय हो...कोरोना सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत शांत असतो का? या वेळात तो कोणालाच काही करत नाही का? असे नसेल तर ही वेळ निर्धारित करण्याचे काय कारण? या प्रश्नांची नागरिक चवीने चर्चा करीत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आताच त्यावर आवश्यक उपयायोजना केली नाही तर या जिल्ह्याची स्थिती नागपूरसारखी व्हायला वेळ लागणार नाही. मात्र यावर कोणतेही उपाय जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाही. गुरुवारी जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत अघोषित लाॅकडाऊन आहे. या निर्णयावरून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजता कोरोनाचे संक्रमण होत नाही का? कोरोना रात्रीच आक्रमण करतो का? हे सवाल या आदेशानंतर नागरिकांकडून चर्चिले जात आहे. हा एकप्रकारे विनोदाचा भाग म्हणून विचारात घेतला तरी वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. नागरिक सकाळी घराबाहेर पडतात. दिवसभर शहरे, गावे गजबजलेली असते. बहुतांश नागरिक रात्री ८ वाजतापर्यंत आपापल्या घरी जातात. यानंतर केवळ शतपावलीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. हा एकच धोका कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने रात्रीचा आहे.
दिवसा होणाऱ्या संसर्गावर निर्बंधच नाहीसकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात आली आहे. वास्तविक, याच काळात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती आहे. परंतु या काळात कोणतेही निर्बंध नाही.
‘स्प्रेडर’वर नियंत्रण कसे मिळवाल?कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचा शोध घेऊन आरटीपीसीआर वा ॲन्टिजेन चाचणी अल्पावधीत व्हावी, यासाठी कोणत्याही उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाहीत.