विजेची मागणी वाढल्याने ‘महानिर्मिती’वर कोळशाचे संकट
By राजेश मडावी | Published: September 20, 2023 04:31 PM2023-09-20T16:31:07+5:302023-09-20T16:31:24+5:30
वीजनिर्मिती घटणार : चार केंद्रांत पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा
चंद्रपूर : पावसाने उसंत दिल्याने उष्णता वाढली. त्यातच विजेची मागणी वाढली असताना वीज केंद्रांमध्ये आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध नाही. राज्यातील चार केंद्रांत तर पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, ‘महानिर्मिती’ने कोळसा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.
राज्यात ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता ९ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करीत आहे. यासाठी दररोज जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन कोळसा आहे. मात्र, नशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रांत चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे.
त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरल्यास किंवा रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मिती करणे कठीण होणार आहे. औष्णिक वीज केंद्रातून अखंडितपणे वीजनिर्मिती करता यावी, म्हणून केंद्रात सात दिवस पुरेल एवढ्या कोळशाचा साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा कोळशाचा साठा खाली आल्यास क्रिटिकल परिस्थिती, तर चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध असल्यास सुपर क्रिटिकल परिस्थिती समजली जाते.
वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा
खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ या चार वीजनिर्मिती केंद्रात ५ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. पारस केंद्रात ४ दिवस, नाशिक केंद्रात ८ दिवस, तर कोराडी वीज केंद्रामध्ये ९-१० दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक असल्याने वेळेवर उपलब्ध झाले नाही तर उत्पादन ठप्प होऊ शकते.