सर्दी, तापाने उडविली झोप, औषध दुकानांमध्ये गर्दी वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:19+5:302021-02-22T04:17:19+5:30
कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे रुग्णालयात जाऊन तपासणीकडे अनेक जण ...
कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे अनेकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे रुग्णालयात जाऊन तपासणीकडे अनेक जण दुुर्लक्ष करीत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, मध्येच ऊन, तसेच रात्रीच्या सुमारास कधी थंडी, कधी गर्मी जाणवत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक घरगुती उपचार करून आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यांनी उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बाहेरील खाद्य टाळा
उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळूनच प्यावे, घरातील परिसर कोरडा ठेवावा, माशांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वच्छता राखा, लक्षणे आढळताच डॉक्टरांना दाखवा. रुग्णांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दूषित पाणी पिल्याने पोटाचे विकार उद्भवतात. खाद्यपदार्थांवर बसणाऱ्या माशांमुळेही पोटाच्या विकारांचा जास्त धोका उद्भवतो. त्यामुळे घरात स्वच्छता पाळून दूषित पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे.
कोट
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फिव्हरचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सुदृढ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. पाणी उकळून प्यावे, अंगावर आजार न काढता त्वरित रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.