जिल्हाधिकारी पोहोचले आदिवासींच्या दारात

By admin | Published: May 23, 2014 11:48 PM2014-05-23T23:48:02+5:302014-05-23T23:48:02+5:30

जनता आणि प्रशासन यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल गुरुवारी केला. निवडणुकीचा ताण उतरताच काल ते आदिवासीबहुल कन्हारगावात पोहचले. तिथे अडीच तास

The Collector reached the tribals door | जिल्हाधिकारी पोहोचले आदिवासींच्या दारात

जिल्हाधिकारी पोहोचले आदिवासींच्या दारात

Next

कन्हारगावात घालविली रात्र : गावकर्‍यांशी साधला संवाद

सुरेश रंगारी -कोठारी

जनता आणि प्रशासन यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल गुरुवारी केला. निवडणुकीचा ताण उतरताच काल ते आदिवासीबहुल कन्हारगावात पोहचले. तिथे अडीच तास गावकर्‍यांशी संवाद साधला आणि गावालगतच्या विश्रामगृहात मुक्कामही केला. पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी गावकर्‍यांत मिसळून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. यामुळे गावकरी भारावले असून आदिवासींच्या समस्याही प्रशासनाच्या थेट कानावर पडल्यात. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ कि.मी. अंतरावर गोंडपिंपरी तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल कन्हारगाव वनग्राम आहे. गावाची ६७८ लोकसंख्या असून २०० कुटुंब आहेत. गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य. गावात जाण्यासाठी पक्की सडक नाही. वाहतुकीची साधने नाहीत. समस्यांनी बरबटलेल्या गावात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, गोंडपिंपरीचे उपविभागीय अधिकारी तथा रोहयो जिल्हाधिकारी चंद्रभान पराते, गोंडपिंपरीचे तहसीलदार मंडलिक विराणी, संवर्ग विकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा रात्री ८ वाजता कन्हारगावात पोहचला. जि.प. शाळेच्या मोकळ्या मैदानात गावकर्‍यांना बोलाविण्यात आले. आधी घाबरत आलेले ग्रामस्थ नंतर मात्र मोकळे झाले. त्यांच्यासोबत बसून जिल्हाधिकार्‍यांनी मनमोकळी चर्चा केली. खुद्द जिल्हाधिकारी आपल्यासोबतच बसून बोलत आहे, हे चित्र त्यांच्यासाठी अनोखे होते. अडीच तासांच्या चर्चेत अनेक विषय आले. गावकर्‍यांनी रस्त्याची प्रमुख समस्या मांडली. गावापर्यंत येण्यासाठी पक्क्या सडकेची मागणी केली. गावात अनेकांना शिधा पत्रिका नसल्याचे सत्य या चर्चेत प्रगटले. येथील गरोदर महिलांना १५ ते २० कि.मी. अंतरावर दवाखान्यात जावे लागते. बरेचदा नाईलाजाने गावातच बाळंतपण करावे लागते. आरोग्य विषयक कुठलीही सोय गावात नाही. जिल्हाधिकार्‍यांनी तब्बल अडीच तास गावकर्‍यांसोबत चर्चा केली. यात विदारक सत्य पुढे आले. जिल्हाधिकारीही अचंबित झाले. त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना समस्या त्वरित निकाली काढण्याच्या सूचना केल्या. गावात कुठलीही समस्या आली आणि अधिकार्‍यांनी सोडविण्यात कसर केली तर न घाबरता भेटा, असे सांगितले. रात्री १०.३० वाजेपर्यंत गावकर्‍यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्‍यांनी गावातच मुक्काम करण्याचे ठरविले. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा त्यांनी गावात फेरफटका मारून समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शासकीय कामांचा आढावादेखील घेतला. कन्हारगावचे सरपंच सुभाष संगीडवार, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, तलाठी दिनकर शेडमाके, रामअवतार लोणकर, विस्तार अधिकारी विजय चन्नावार, वन विकास महामंडळाचे वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, कृषी मंडळ अधिकारी राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी मडावी, वनविभागाचे वनरक्षक शेडमाके, पो.पाटील बंडू आलाम, यांच्याशी चर्चा करून गावविकासाकडे व समस्या निकाली काढण्यासाठी सूचना केल्या.त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांचा ताफा चंद्रपूरकडे रवाना झाला. जिल्हाधिकारी गेले मात्र कन्हारगाव व परिसरात त्यांच्या आकस्मिक दौर्‍याचीच चर्चा होती. समस्या सुटतील असा विश्वासही व्यक्त होत होता.

Web Title: The Collector reached the tribals door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.