चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ८ व ९च्या कोळसा हाताळणी विभागातील कन्वेअर बेल्टला आग लागली. याची माहिती होताच सदर बेल्ट कापून अग्निशमन विभागाच्या पथकाने काही मिनिटांतच आग विझविली. या घटनेमुळे वीज निर्मितीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे उपमुख्य अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच ८ व ९ च्या कोळसा हाताळणी विभागातील कन्वेअर बेल्ट १०४ ला रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आग लागल्याचे लक्षात येताच, आग विझविण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. आग सगळीकडे पसरू नये, म्हणून बेल्ट कापून लगेच अग्निशमन विभागाला आग लागल्याचे कळवण्यात आले. अग्निशमन विभागाचे कर्मचारी लगेच ठिकाणावर दाखल झाले व ४५ मिनिटांत आग विझविण्यात यशस्वी झाले. आग लागण्याच्या नेमक्या कारणाचा तपास करण्याकरिता मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत पापडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, परंतु लागलेल्या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसून, वीजनिर्मिती करणाऱ्या संचाच्या उपलब्धतेवरही कोणताही परिणाम झालेला नाही, असे उपमुख्य अभियंत्यांनी सांगितले.