कोरोनामुळे ग्रामीण व्यावसायिकांचीही झाली कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:49+5:302021-06-04T04:21:49+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील छोटे उद्योग व पूर्णत: कोलमडले आहेत. ग्रामीण लोकांच्या कुटुंबाचा आधार असलेल्या चहा टपऱ्या, भजी ...
अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील छोटे उद्योग व पूर्णत: कोलमडले आहेत. ग्रामीण लोकांच्या कुटुंबाचा आधार असलेल्या चहा टपऱ्या, भजी विक्रेते, सलून दुकाने, इस्त्री करणारे, बुरूड कामगार, शिंपी, व्यावसायिक फोटो स्टुडिओ, शीतपेय विक्रेते अशा छोट्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या व्यवसायांत अनेक निराधार, परित्यक्ता, विधवा महिलांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायांवर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा याच व्यवसायांवर उभा आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सारेच हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने काहींना मदत जाहीर केली आहे. मात्र यातील बहुतेकांना त्याचा लाभच झाला नाही.
मागील दीड महिन्यापासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजूरही अडचणीत सापडले आहेत. हातांना काम नाही. त्यामुळे पैशांची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पन्नातून भागविण्यास मोठी मदत होत असताना मागील वर्षाप्रमाणेच लाॅकडाऊनमुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे.
आता खरीप हंगाम आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व अडचणींचा विचार करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने शासन प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची सध्या तरी गरज आहे.
बॉक्स
चूल कशी पेटणार?
कोराेनामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजचा व्यवसाय करून रात्री चूल पेटणाऱ्या घरात चिंता आहे. कोरोनाचा धोका कधी टळणार आहे, याबाबत काहीच कल्पना करता येत नाही. आता तर तिसऱ्या लाटेसंदर्भातही बोलले जात आहे. त्यामुळे या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
रस्त्यांवर बसून विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला आहे. रोज होणाऱ्या कमाईवर ज्यांचे पोट अवलंबून आहे, अशा छोट्या व्यावसायिकांचे जगणे सध्या तरी कठीण झाले आहे.
लहान व्यावसायिकांमध्ये हातगाड्यांबरोबरच पानटपऱ्या, चहाचे गाडे, छोटे हॉटेल, खाद्यपदार्थांचे गाडे, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते, पंक्चर काढणारे, चप्पल शिवणारे, विविध वस्तू दुरुस्त करणारे, आदी व्यवसायांचा समावेश आहे. शहरात फिरून भीक मागून खाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यांनाही रोजचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.
बाॅक्स
मागील वर्षी काही सामाजिक संस्थांनी भोजन पुरवठा करून अनेकांना आधार दिला होता. मात्र या वर्षी असे उपक्रम बंदच आहेत. परिणामी भिकारी तसेच मागून खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.