जनसमस्या जाणून घ्यायला नगरसेवकांकडे वेळच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:28 AM2021-04-04T04:28:50+5:302021-04-04T04:28:50+5:30

लोकमत आपल्या दारी परिमल डोहणे, रवी जवळे, राजेश मडावी चंद्रपूर : शहरात सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे जाळे विणण्यात येत असले तरी ...

Corporators do not have time to know the problems of the people | जनसमस्या जाणून घ्यायला नगरसेवकांकडे वेळच नाही

जनसमस्या जाणून घ्यायला नगरसेवकांकडे वेळच नाही

Next

लोकमत आपल्या दारी

परिमल डोहणे, रवी जवळे, राजेश मडावी

चंद्रपूर : शहरात सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे जाळे विणण्यात येत असले तरी येथील विठ्ठल मंदिर प्रभागातील अंतर्गत रस्त्याची दैना झाली आहे. अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी फोडलेल्या रस्त्याची केवळ थातूरमातूर डागडुजी केली आहे. बहुतांश रस्त्याची गिट्टी उखडली आहे. मात्र या समस्या जाणून घ्यायला विठ्ठल मंदिर प्रभागातील चारपैकी एकाही नगरसेवकाला वेळ नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. शनिवारी सकाळी ‘लोकमत’ चमूने विठ्ठल मंदिर प्रभागात फेरफटका मारला असताना नानाविध समस्या दिसून आल्या.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात विठ्ठल मंदिर स्टेडियम, टांगोर शाळा परिसर, विश्वकर्मा चौक, बिनबा वॉर्ड, जोडदेऊळ, पठाणपुरा परिसर, गोपालपुरी, गडला हनुमान मंदिर, गणपती मंदिर परिसर आदी भागाचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. चार वॉर्ड एकत्र हा विठ्ठल मंदिर प्रभाग तयार करण्यात आला आहे. या प्रभागाचे नेतृत्व विशाल निंबाळकर, संगीता खांडेकर, प्रशांत दाणव, सीमा रामेडवार हे चार नगरसेवक करीत आहेत. मात्र हे नगरसेवक केवळ ज्या परिसरात राहतात. त्याच परिसराच्या विकासावर लक्ष देतात. मात्र इतर परिसरात ढंकूनही बघत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.

पठाणपुरा परिसरातील नाली चोकअप झाल्याने खोदकाम करुन पाईप काढण्यात आले आहे. मात्र याला आठ दिवसांचा कालावधी होत असूनसुद्धा काम करण्यात आले नाही. नळयोजनेच्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र पाईप टाकल्यानंतर त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. व्यायाम शाळा मंदिर परिसर व गडला हनुमान मंदिर परिसरात पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. मात्र परिसराच्या स्वच्छतेकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.

------

बॉक्स

नगरसेवकांचे दर्शन दुर्लभ

निवडणुकीच्या तोंडावर मताचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी येणारे नगरसेवकाचे दर्शन दुर्लभ झाले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यामुळे प्रभागाच्या समस्या जैसे थे आहेत. नगर परिषदेचे रूपांतर मनपामध्ये झाल्यानंतर या प्रभागाचे नेतृत्व चार नगरसेवकांकडे देण्यात आले. त्यामुळे प्रभागाचा विकास होईल अशी आशा नागरिकांना होती. मात्र ती आशा धूसर झाली असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले.

बॉक्स

एका दिवसाआड पाणी

शहराची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरई नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. त्यामुळे शहरातील इतर प्रभागात दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, या प्रभागात पाण्याची टाकी असूनसुद्धा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रभागात अनेक ठिकाणी हातपंप आहेत. मात्र ते हातपंप बंद आहेत. रविंद्रनाथ टागोर शाळेच्या पटांगणातील हातपंपाला लागूनच मोठे डबके आहे. त्यामुळे आरोग्याचा समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. गडला हनुमान मंदिर परिसरातील हातपंपाला शेजारी गोवऱ्या टाकून ठेवल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

बॉक्स

रेतीची तस्करी आणि नगरसेवक

विठ्ठल मंदिराच्या मागच्या इरई नदी घाटावरून दिवसा-रात्री मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करण्यात येते. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उखळला आहे. रेती तस्करीमध्ये नगरसेवकांचाच हात असल्याचा आरोपही प्रभागातील नागरिकांनी केला आहे.

---------

बॉक्स

नाल्या तुंबल्या

शहरातील बहुतांश नाल्या अरुंद व निमुळत्या आहेत. त्यातच त्याचा उपसा केला नसल्याने तुंबल्या असतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते. पावसाळ्यापूर्वी नाल्याचा उपसा करणे गरजेचे आहे. मात्र यंदा अद्यापही नाल्याचा उपसा करण्यास सुरुवात करण्यात आली नाही.

---------

नागरिक काय म्हणतात...

शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. येथील नाल्याही तुंबल्या आहेत. त्याचा उपसा करणे गरजेचे आहे.

- गजानन सोनटक्के, चंद्रपूर.

-----

प्रभागात विविध समस्या आहेत. नगरसेवक प्रभागात दिसून येत नाही. त्यामुळे प्रभागाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. रस्तेही पूर्णत: उखडले आहेत.

-विशाल रामेडवार, चंद्रपूर.

------

मागील अनेक वर्षांपासून रस्ता बनविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही लक्ष दिले नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. नाल्याचा उपसाही नेहमी होत नाही.

- रजंना खडसे, चंद्रपूर.

----------

गोपालपुरी बापूजीनगर येथील रस्त्याचे बांधकाम अद्यापही करण्यात आले नाही. भूमीगत नाल्या नसल्याने नेहमीच नाल्या तुंबलेल्या असतात. बरेचदा दुर्गंधी सुटत असते.

- श्याम राजुरकर, चंद्रपूर.

-------

चौकामध्ये कचरा कुंड्यांचा अभाव आहे. कचराकुंड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. रस्त्यावरील पथदिवे बरेचदा बंद असतात. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरले असते.

- मंगेश बोकडे, चंद्रपूर.

Web Title: Corporators do not have time to know the problems of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.