संदीप झाडे
कुचना : केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला मागील वर्षापेक्षा प्रति किलो ४० पैसे वाढ म्हणजे प्रतिक्विंटल ४० रुपये भाव आहे. या वर्षी गव्हाचा भाव २०१५ रुपये, तर हरभरा पिकाला प्रति किलो १ रुपया ४० पैसे यानुसार प्रति क्विंटल १४० रुपयाने वाढ आहे. आता ५२३० रुपये हमीभाव असणार आहे.
दरवर्षी बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमती वाढत आहे. त्याचबरोबर मजुरीही वाढत असल्याने उत्पादनखर्च वाढत आहे. अशातच केंद्र सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर केल्या. ज्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्प प्रमाणात भाववाढ देण्यात आली. त्यामुळे उत्पादनखर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीभावात मात्र ४० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर झाला. ट्रॅक्टरद्वारे मशागत, पेरणी, काढणी, नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने त्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर पडतो आहे. परिणामी उत्पादनखर्च वाढतो तो हजारांच्या घरात, मात्र पदरी पडते रुपयांच्या दरात. त्यामुळेच शेतीचा व्यवसाय नुकसानीचा होत असल्याचे बोलले जाते.
कोट
सिलेंडर भाव वर्षभरात १५० रुपयाने, पेट्रोल १०० च्या पुढे. मात्र हमीभाव ४० रुपयाने वाढत आहे म्हणजेच शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, हीच केंद्र व राज्य सरकारची भूमिका दिसत आहे.
- प्रकाश निब्रड, शेतकरी रा. पळसगाव ता. भद्रावती.
शेतकरी राब राब राबतो. तरीही शेतकऱ्यांचा जर उत्पादनखर्च भरून निघत नसेल, त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नसेल तर हा हमीभाव काय कामाचा?
- कपिल रांगणकर, शेतकरी, राळेगाव, ता. भद्रावती.
आजपर्यंतच्या केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण हे सातत्याने शेतकरीविरोधी आहे. त्यात तातडीने बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल निघाला की भाव कोसळतात आणि शेतमाल संपला की भाव वाढतात. मग भाव कमी करण्यासाठी विदेशातून माल आयात करतात. पण, याचा फायदा विदेशातील शेतकऱ्यांना होताे. तोच चांगला भाव आपल्या शेतकऱ्यांना दिला तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर होईल.- गुड्डू एकरे, प्रगतशील शेतकरी, पाटाळा, ता. भद्रावती.