धान पिकाच्या संरक्षणासाठी झेंडू व बाजरीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:28+5:302021-08-13T04:32:28+5:30
नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार राजू गेडाम मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात ...
नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार
राजू गेडाम
मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असतो. हे टाळण्यासाठी मूल येथील युवा शेतकऱ्याने सात एकर धानाच्या शेतात पाव एकरात झेंडूची व बाजरीची लागवड केली आहे. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. त्याचवेळी बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्यास आगेकूच करतील. त्यामुळे धान पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीचे देखील संरक्षण होईल. यातून तिहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न मूल येथील युवा शेतकरी राहुल आगडे यांनी केला आहे.
विदर्भात धान शेतीला फार महत्त्व दिले जाते. धानशेती हा मुख्य व्यवसाय असून जास्तीत जास्त शेतकरी धानाची लागवड करीत असतात. धानाची शेती ही निसर्गावर अवलंबून असते. पावसाचे प्रमाण, वातावरण यावर धानाचे उत्पादन अवलंबून असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर परिणाम होऊन उत्पादन कमी होते. त्यावेळी लावलेला खर्चदेखील निघणे अवघड जात असते. हे टाळता यावे म्हणून मूल येथील युवा शेतकरी राहुल सुरेश आगडे यांनी पिकाचे किडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी नवीन तर्कशुद्ध शक्कल लढविली. जेव्हा धानाचे पीक गर्भात असते, तेव्हा किड्यांचा त्रास सुरू होतो. ते धान पिकावर बसून त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे धान उत्पादन क्षमता मंदावते व मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी राहुल आगडे याला नवीन कल्पना सुचली. धानाच्या शेतीलगत त्याने पाव एकरात झेंडूची लागवड केली. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. जवळच असलेली बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्याकडे आपला मोर्चा वळवितात. त्यामुळे धान पिकाचे संरक्षण करण्यास पोषक ठरते. यामुळे पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीच्या पिकाचे देखील संरक्षण होते.
बॉक्स
झेंडूलाही चांगली मागणी
दिवसेंदिवस झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून सणासुदीच्या दिवशी या फ़ुलांना मोठी मागणी असते. यातून आर्थिक विकासाला देखील हातभार लावता येतो. तसेच बाजरीलादेखील मागणी आहे. बाजरीच्या भाकरी पौष्टिक असल्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात योग्य नियोजन केल्यास आर्थिक उन्नती होऊ शकते.