चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे कमी जास्त प्रमाणात सर्वांचेच मोठे नुकसान झाले. अनेकांना आपल्या जवळच्यांचा जीव गमवावा लागला तर काहींचा रोजगार गेला आहे. मात्र यामध्ये दिव्यांग तसेच अंध व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून संकटाचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका दिव्यांगाना बसला आहे. शासनाने नोंदणीकृत मजूर तसेच इतरांना मदतीचा हात समोर केला आहे. मात्र अंधाना अद्यापही आधार नसून केवळ निराधार म्हणून एक हजार रुपयेच मिळत आहे. मात्र महागाईच्या काळामध्ये हजार रुपयांत त्यांचे काहीच भागत नसल्याचे चित्र आहे.
काही अंधांची परिस्थिती बिकट झाली आहे. लाॅकडाऊनपूर्वी मिळेल ते काम तसेच आपल्या कौशल्याच्या भरवशावर ते कमाई करून पोट भरत होते. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यातच मागील महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाल्यामुळे जवळचे होते ते सर्वच संपल्यामुळे आता जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
बाॅक्स
निराधार भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी
शासनाकडून निराधारांना दरमहा एक हजार रुपये मानधन दिल्या जाते. मात्र सध्याची महागाई बघता एक हजार रुपयांमध्ये काहीच होत नाही. त्यामुळे निराधार अंधांना दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
बाॅक्स
उदरनिर्वाहासाठी काही अंध नागरिक रेल्वे, बस, बसस्थानकामध्ये, तसेच इतर ठिकाणी छोटेमोठे साहित्य विक्री करतात. मात्र लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे सर्वांचेच व्यवसाय बंद झाले. परिणामी कसे जगायचे, असा प्रश्न सध्या त्यांना पडला आहे.
कोट
आधारही एकमेकांचाच
कोरोना काळ प्रत्येकांसाठी अडचणीचा आहे. मागील वर्षी आपण उच्च न्यायालयाला पत्र पाठवून निराधारांना पाच हजार रुपये मानधन देण्यासाठी शासनाला सांगण्यासाठी विनंती केली होती. मात्र यावर अद्यापपर्यंत काहीच झाले नाही. निराधारांना शासनाकडून एक हजार रुपये मानधन मिळते. मात्र यात त्यांचे काहीच होत नाही.
-रवींद्र ताकसांडे
सचिव, राष्ट्रीय अंध जनकल्याण बहुउद्देशीय संस्था