चंद्रपूर : राजुरा तुक्यातील पोवनी २ कोळसा खाणीत काम करत असताना खाणीतील पाण्यात बुडून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा युवक खाणीतील पाण्यात मोटार पंपावर काम करत असताना खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.विशाल गणपत हंसकर(२५) रा. वरोडा असे मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहे.
विशाल हा युवक एका ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून पोवनी २ कोळसा खाणीत पंपावर काम करत होता. विशाल सोबत साखरी येथील श्रीकांत बेसूरवार आणि बाबापूर येथिल आशिष मुके सह इतर कामगार खाणीतील मोटार पंपाचे काम करीत होते. या ठिकाणचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कामगार पाण्यात कोसळले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना विशाल पाण्यात बुडून मृत्यू झाला तर सोबत असलेल्या दोन युवकांना पाण्यातून बाहेर काढण्यास यश मिळाले.
ह्या घटनेमुळे वेकोलि खाणीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन कंत्राटी तसेच कायम कामगारांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी तसेच सुरक्षा आढावा व उच्चस्तरीय चौकशी करून वेकोलीच्या जबाबदार सुरक्षा अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून मृतकाच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केला जात आहे. वृत्त लिहीपर्यंत मृतदेह वेकोलि परिसरातच ठेवून नुकसान भरपाईची मागणी केला जात आहे. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेकोलीतील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
वेकोलीत कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत नसल्याने कामगारांचा नाहक बळी जात आहे.सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून वेकोली कामगारांच्या जीवाशी खेळ करीत आहे. कोळसा खाणीत कामगाराचा मृत्यू झाल्याने वेकोलितील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.