चंद्रपूर : कोरोनावर अद्यापही रामबाण असे औषध उपलब्ध नाही. काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. यातही शहरी व ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने आजीबाईंच्या बटव्यातील व निसर्गात उपलब्ध हाेणाऱ्या वनस्पती व वस्तूंचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजीबाईंचा बटवा काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी उपयुक्त ठरत असून, राेगप्रतिकारकशक्तीही वाढत आहे.
विज्ञानाने एवढी प्रगती केली असली, तरी ताप, सर्दी, खाेकला आदी लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण घरगुती उपाय करतात. काेराेना संसर्गात अशाचप्रकारे प्राथमिक व पूर्व उपाययाेजना म्हणून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, हळदीचा काढा, अद्रकचा रस काढून तो प्राशन केला जात आहे. मिठाच्या गुळण्यांमुळे घशात येणारे फाेड व सूज कमी हाेते, तर हळदीच्या काढ्यामुळे राेगप्रतिकारकशक्ती वाढते. अद्रकचा रस गळ्यातील कफ कमी करताे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही अनेक नागरिक अशाप्रकारच्या उपाययाेजना करताना दिसून येत आहेत; परंतु या सर्व उपाययाेजना काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वी करता येऊ शकतात किंवा साैम्य लक्षणे दिसताच अनेकजण करतात; परंतु अधिक लक्षणे आढळल्यास याेग्य वैद्यकीय सल्ला घेणेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञाने म्हणणे आहे.
बॉक्स
सदी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यावर आम्ही घरगुती उपाय करीत असतो. खाेकल्यासाठी मधाचे सेवन करीत असतो. प्राथमिक स्वरूपात आजार असताना वेळीच उपाययाेजना करीत असल्याने रुग्णालयापर्यंत जावे लागत नाही. कोरोनाकाळात वाफारा घेणे, अद्रक, लसूणचा काढा पिणे, आदी उपाय करीत आहोत.
- मीराबाई रामटेके
----
माझ्या आई-वडिलांपासूनच आम्ही छोट्या-मोठ्या आजारांवर घरगुती उपाय करीत असतो. दररोज सकाळी लवंग, अद्रक, लसणाचा चहा पित असतो. खोकला झाला, तर हिरडा खात असतो. साधारण ताप आल्यानंतर भुईनिंबाच्या पानांचा काढा सकाळ व सायंकाळी पित असतो.
- सखुबाई रंगारी
-----
आताची मुले पूर्वीचे नैसर्गिक उपचार करायला तयार नाहीत. परंतु, निर्सगामध्ये खूप ताकद आहेत. त्यातील औषधी गुणधर्माच्या आधारावर आपला आजार दूर होऊ शकतो. ताप व खोकल्यासाठी अडुळसा, हिरडा, बेहडा यांचे सेवन केल्यास आपली प्रकृती बरी होण्यास मदत मिळत असते.
- द्वारकाबाई रामटेके
------
कोरोना काळात मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दररोज ध्यान, ओमकार जप करणे गरजेचे आहे. यासोबतच योगा, प्राणायाम, दीर्घश्वसन आदीद्वारे आरोग्य सुस्थितीत ठेवता येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपली दिनचर्या ठरलेली असावी, संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. यासोबत गुळवेल, अश्वगंधा, तुळस याचे सेवन करावे. कोमट पाण्यात मीठ टाकून किंवा हळदीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सायंकाळच्यासुमारास कडुनिंब, गोवरी, सैंधव मीठ टाकून धूपण केल्यास वातावरणाचे शुद्धीकरण होईल. आयुर्वेदातील नस्यक्रम (नाकात तेल किंवा गाईच्या तुपाचे दोन थेंब टाकणे) केल्यास जंतूचा नाश करणे शक्य होईल, आणि आपले आरोग्य सुरळीत राहील.
- डाॅ. राजीव धानोरकर, एमडी, आयुर्वेदिक, चंद्रपूर
------
लवंग-वेलदोड्याचा चहा
लवंग व वेलदोडामिश्रित चहामुळे व्यक्तीला याेग्य श्वास घेण्यास मदत हाेते. फुफ्फुस उत्तेजक म्हणूनही अशाप्रकारचा चहा नागरिक घेतात. लवंग व वेलदोड्यामुळे रक्ताभिसरण क्रियेतील दाेष काढण्यास याेग्य प्रमाणात मदत हाेते. आयुर्वेदात लवंग व वेलदोड्याचे महत्त्व आराेग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.
----
गुळवेल-हळदीचे पेय
गुळवेल हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. गुळवेलचा काढा पिल्याने शरीरातील तापमान याेग्य राखण्यास मदत हाेते. ताप आल्यानंतर अनेकजण गुळवेलचा काढा पितात. गुळवेल व हळद टाकून तयार केलेले मिश्रण आराेग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात गुळवेलचा उपयाेग नागरिक करतात.
-----
तुळशीच्या पानांचा काढा
प्रत्येकाच्या अंगणात तुळस असते. आराेग्यदायी तुळस बऱ्याचप्रकारच्या आराेग्यविषयक समस्यांवर गुणकारी आहे. अँटिबायाेटिक औषधी म्हणूनही वापर केला जाताे. तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा पानांचा काढा घेतल्याने गळ्यातील खवखव निघून जाते. सर्दी, खाेकल्यासारखे आजार बरे हाेतात.