लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृहात तातडीची आढावा बैठक घेतली.शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील ४० वर्षीय महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे तातडीची बैठक बोलावली. यावेळी उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, मनीष सिंग, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर आदी उपस्थित होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असली तरी या परिसरात कॅम्प लावून नागरिकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे गरज असल्याचे डॉ. मनीष सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट हा काळजी करण्याजोगा असल्याचे जाहीर केले. मात्र, या व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते हे सांगणारी कोणतीही आकडेवारी अजून उपलब्ध नाही, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात लस घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा जाणून घेत आहे रूग्णाची हेल्थ हिस्ट्रीकोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाच 'डेल्टा प्लस' आढळल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला. या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णाने कुठे प्रवास केला. रूग्णाचे लसीकरण झाले होते का, कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का ? आदी माहिती आरोग्य यंत्रणा जाणून घेत आहे.
नागरिकांनी मनात भीती ठेऊ नयेभद्रावती शहरातील एका रूग्णाचा अहवाल डेल्टा प्लसचा पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून वरोरा शहर व तालुक्यात आरोग्य जागृती, लसीकरण व कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. वरोरा शहरात सारीचे सर्वेक्षणही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कोणतीही शंका वा भीती मनात ठेऊ नये. कोरोना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर