१० महिन्यांपासून फायर वाॅचर मजुरीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:03+5:302021-02-10T04:28:03+5:30
तोहोगाव : मध्य चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या सर्वच वनपरिक्षेत्रांतील मागील फेब्रुवारी ते जून या कालावधीत कामे केलेल्या अग्निरक्षक (फायर वाॅचर) ...
तोहोगाव : मध्य चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या सर्वच वनपरिक्षेत्रांतील मागील फेब्रुवारी ते जून या कालावधीत कामे केलेल्या अग्निरक्षक (फायर वाॅचर) यांची अजूनही मजुरी देण्यात आली नसल्याने त्या मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी जंगलात आग लागून वन्यजीवाचे, जैवविवधेतचे नुकसान होऊ नये, रोपवन क्षेत्रात आग पसरू नये, पर्यायाने वनसंपदेचे नुकसान होऊ नये म्हणून वनवणवा प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नियतवन क्षेत्रात कक्षनिहाय अग्नी जाळ रेषा काढून तो कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे आग लागलीच तरीही दुसऱ्या कक्षात आग पसरत नाही. या कामासाठी दरवर्षी विशेष निधीचे नियोजन असते. त्या कामासाठी वनपरिक्षेत्राचे प्रत्येक नियत वनक्षेत्रनिहाय हंगामी अग्निरक्षक (फायर वाॅचर) नियुक्त केले जाते. त्यानुसार मध्य चांदा वनविभागाचे राजुरा, कोठारी, धाबा, विरुर, बल्लारपूर, जिवती, वनसडी या वनक्षेत्रात सुमारे शंभरावर हंगामी फायर वाॅचरनी मागील फेब्रुवारी ते जून २०२० महिन्यात कामे केलीत. परंतु वर्ष लोटत आले असतानाही जूनपर्यत त्यांना त्या कामाची मजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत या मजुरांनी संबंधित वनाधिकाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे मजुरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मजुरांचे आर्थिक शोषण करून मानवी मूल्यांचे हनन होत असल्याचा आरोप केला जात आहे.
असे असतानाही यावर्षीचा वनवणवा हंगाम सुरू झाला असतानाही जाळ अग्निरेषा कामे सुरू झालेली नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे. वरिष्ठ वनाधिकारी व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन चौकशी करावी. तसेच थकीत मजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी आहे.