चंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत राज्यात आदर्श ग्राम ठरलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील जिल्हा सुंदर (स्मार्ट) गाव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांच्या हस्ते घाटकुळच्या माजी सरपंच प्रीती नीलेश मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, स्वेच्छाग्रही राम चौधरी, संगणक चालक आकाश देठे, रोजगार सेवक वामन कुद्रपवार, कर्मचारी अनिल हासे, उत्तम देशमुख, महिला ग्रामसंघ अध्यक्ष भाग्यश्री देठे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. घाटकुळ हे जिल्ह्यातील पहिले सुंदर गाव ठरले आहे. तालुका स्तरावर २० लाख रुपये व जिल्हा स्तरावर ५० लाख रुपये असा एकूण ७० लाखांचा ‘जिल्हा सुंदर गाव पुरस्कार’ आदर्श गाव घाटकुळने पटकावला आहे. लोकसहभाग व श्रमदानातून गावकऱ्यांनी केलेली कामे, ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना, गावहितासाठी राबविलेले कल्याणकारी उपक्रम व त्यातून घडलेल्या परिवर्तनामुळे घाटकुळ गाव राज्यात आदर्श ग्राम, हरित व स्वच्छ ग्राम, जिल्हा स्मार्ट व सुंदर ग्राम ठरले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शता या स्मार्ट व सुंदर ग्राम निकषांवर गावाचा गौरव करण्यात आला. गावातील शाळा, अंगणवाडीही ‘आयएसओ’ नामांकित आहे.
विकासासाठी गावकऱ्यांचे योगदान
थेट ‘आयएसओ’ नामांकित ग्रामपंचायत म्हणून लोकार्पण झालेली घाटकुळ ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ६ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची बालपंचायत येथे कार्यरत आहे. सौरऊर्जा, बायोगॅस, एलईडी बल्बचा वापर नियमित होतो. गावातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे असून, गावकरी, निर्मल महिला ग्रामसंघ, युवा जनहित मंडळ व मराठा युवक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षकांनी गावाच्या विकासात योगदान दिले आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.