वीज बिल थकीत ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:38 PM2018-03-28T23:38:51+5:302018-03-28T23:38:51+5:30
वीज बिल थकित असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश शासनस्तरावरून महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाचे फलित झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वीज बिल थकित असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश शासनस्तरावरून महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाचे फलित झाले आहे.
ग्राम पंचायतींच्या वीज देयकांचा भरणा करण्यास अनेक ग्रामपंचायती असमर्थ असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. वीज देयके तत्काळ भरण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भोंगळे यांनी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमनत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागणीची तातडीने दखल घेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशा सूचना शासन स्तरावरून महावितरणला देण्यात आल्या आहेत. आता ग्रामपंचायतींच्या वीज देयकांमधील ठराविक आर्थिक भार शासन उचलणार असून यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना चांगलाच दिलासा मिळाला असून ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचीही होणारी गैरसोय टळली आहे.