डॉक्टरांनी रुग्णांसोबत सुसंवाद साधणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:26+5:302021-04-09T04:30:26+5:30
चंद्रपूर : डॉक्टर व रुग्णांचे संबंध चांगले असावेत, यासाठी रुग्णांशी सुसंवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अशोक ...
चंद्रपूर : डॉक्टर व रुग्णांचे संबंध चांगले असावेत, यासाठी रुग्णांशी सुसंवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अशोक वासलवार यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते डॉक्टरांचे कर्तव्य व समाजातील या व्यवसायाबद्दलचे गैरसमज याबाबत मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे, आयएमएचे अध्यक्ष व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, आय.एम.ए.चे. माजी अध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, सचिव डॉ. अनुप पालीवाल, डॉ. अभय राठोड आदी उपस्थित होते. डॉ. वासलवार पुढे म्हणाले, प्रत्येक रुग्ण आजारातून किंवा व्याधीतून मुक्त झाला पाहिजे, अशी अपेक्षा असते. बहुधा वैद्यकीय गुंतागुतीमुळे व सोबत असलेल्या मोठ्या आजारामुळे ते साध्य होत नाही. अशा वेळेला डॉक्टराबद्दल गैरसमज होतो. औषधोपचार करताना आजारपणात लागणाऱ्या खर्चाबद्दल पण बऱ्याच वेळा नाराजी येते. रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. आजच्या व्हाॅट्सॲप, गुगलच्या युगात रुग्ण व नातेवाईकांच्या बऱ्याच प्रश्नांना डॉक्टरांना उत्तर द्यावे लागते. त्याचे समाधान करावे लागते. डॉक्टरांनी प्रत्येक शब्द तोलूनमापून वापरल्यास गैरसमज दूर होऊ शकतात, असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.