फोटो
बी.यू. बोर्डेवार
राजुरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. मात्र, अजूनही ग्रामीण दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी कोलाम नाल्यातील पाणी पीत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. असेच एक गाव आहे घोडणकप्पी. जिथे रस्ता नाही, पाणीही नाही.
शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना दररोज डोंगरावरची खडकाळ वाट चढावी लागते. महिलांना दररोज पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून गावालगतच्या ओढ्यात खड्डा करून त्यात पाणी झिरपण्याची प्रतीक्षा करावी लागते. ताटव्यांनी उभारलेल्या झोपड्या आणि सभोवताली डंख मारण्यासाठी टपलेल्या सापाच्या भीतीचे सावट. प्रश्न हेच आपले जीवन, समस्या हेच आपले नशीब, असे मानून पिढ्यांमागून पिढ्या पुढे सरकत आहेत. रोजगार नाही, जनजागृती नाही. अधिकारी नाही, पदाधिकारी नाही. कुठल्या शासकीय योजना नाहीत, तेच अज्ञान, तीच बुवाबाजी.
याबाबत येथील कोलाम बांधवांनी अनेकदा ओरड केली. मात्र, त्यांची ओरड त्यांच्या गावापर्यंतच राहिली. ती प्रशासनापर्यंत पोहोचलीच नाही. पोहोचली असेल तरी ती अधिकाऱ्यांना ऐकायची नसावी. त्यामुळे त्यांच्या समस्या आजही कायम आहेत. आता तर या बांधवांनी ओरड करणेही बंद केले आहे. वाट्याला आलेले खरतड आयुष्य हेच नशीब म्हणून ते जगत आहेत. राजुरा तालुक्यात अनेक कोलाम वस्त्या असून, पहाडाच्या लगत असलेल्या अनेक कोलाम वस्त्या अजूनही दुर्लक्षित राहिल्या आहेत.
बॉक्स
या उपेक्षित वस्तीवर तिरंगा फडकवू या
७४ वर्षांत सरकारने दुर्लक्षिलेल्या या वस्तीवर स्वातंत्र्याचे गीत गाऊ या, थोडेसे श्रमदान करून घोडणकप्पीचा रस्ता निर्माण करू या, स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू या, घोडणकप्पीत तिरंगा फडकवू या, असे आवाहन कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केले आहे.
130821\img-20210813-wa0283.jpg
नाल्यातील पाणी घेताना कोलम