लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा प्रभार देताना त्या- त्या तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देणे अपेक्षित असतानाही बहुतांश तालुक्यांत अधिकाऱ्यांच्या मर्जीतील दुसऱ्याच तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे. तर काही तालुक्यांत सक्षम नसतानाही शालेय पोषण आहार अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन शिक्षण विभाग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त पदाबाबतही असाच गोंधळ बघायला मिळत आहे.मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात शिक्षण विभागाने चांगली कामगिरी केली असली तरी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांचा प्रभार देताना मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात बहुतांश तालुक्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर त्याच तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात काही तालुक्यांत ज्येष्ठांना वगळून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना तसेच तालुक्यातील सोडून दुसऱ्याच तालुक्यातील अधिकाऱ्यांवर पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांबाबत नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वीच वरोरा तालुक्यात असाच प्रकार घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी सावरासावर करून वेळ मारून नेली.
शालेय पोषण आहार अधिकाऱ्यांकडे प्रभारजिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार शालेय पोषण आहारच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार सोपविताना ज्येष्ठ तसेच बीएड असणे गरजेचे आहे. त्या-त्या तालुक्यात सक्षम अधिकारी असतानाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे नेमका उद्देश काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
वरोरामध्ये झाला होता गोंधळवरोरा येथील गटशिक्षणाधिऱ्यांचा पदभार देताना दुसऱ्या तालुक्यातील कनिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रभार देण्यात आला होता. यासंदर्भात काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तसेच पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाला आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला.
केंद्रप्रमुखांचा पदभारही इतरांकडेएखाद्या केंद्रातील केंद्रप्रमुखांचे पद रिक्त झाले असेल तर प्रभार देताना शेजारच्या केंद्रप्रमुखांकडे किंवा केंद्र शाळेतील ज्येष्ठ विषय शिक्षकाकडे पदभार द्यावा लागतो. मात्र जिल्ह्यात असे न करता काही कनिष्ठ असलेल्या विषय शिक्षकांकडे तसेच केवळ दहावी शिक्षण असलेल्या शिक्षकाकडे केंद्रप्रमुखाचा पदभार देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
असे आहे प्रभारीभद्रावती तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असतानादेखील या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार राजुरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे, चंद्रपूरच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे गोंडपिपरीचा प्रभार, नागभीडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सिंदेवाहीचा प्रभार, नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार शालेय पोषण विभागाच्या अधीक्षकाकडे, कोरपना तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे वरोरा तालुक्यातील शालेय पोषण विभागाचा प्रभार, चंद्रपूर पंचायत समितीमध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार, बल्हारपूर पंचायत समितीमध्येसुद्धा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडील प्रभार काढून मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. दरम्यान, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांत कनिष्ठ विषय शिक्षकांकडे केंद्रप्रमुखाचा प्रभार तर काही ठिकाणी साहाय्यक शिक्षकांकडे प्रभार देण्यात आला आहे.