शेतकऱ्यांची कर्नाटक, तेलंगणात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 02:27 AM2016-06-13T02:27:30+5:302016-06-13T02:27:30+5:30

महाराष्ट्रात बियाणांचे दर दुप्पट वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी स्वत: बियाणे घेण्यासाठी कर्नाटक व तेलंगाणा राज्यात धाव घेत आहेत.

Farmers run in Karnataka, Telangana | शेतकऱ्यांची कर्नाटक, तेलंगणात धाव

शेतकऱ्यांची कर्नाटक, तेलंगणात धाव

Next

महागाईचा वरवंटा : बियाणांच्या किमतीत झाली दुप्पट वाढ
संतोष कुंडकर/जयंत जेनेकर चंद्रपूर/कान्हळगाव (कोरपना) :
महाराष्ट्रात बियाणांचे दर दुप्पट वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी स्वत: बियाणे घेण्यासाठी कर्नाटक व तेलंगाणा राज्यात धाव घेत आहेत. शेतकरी एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना दुसरीकडे बियाण्यांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. यंदाचा खरीपाचा हंगाम साधण्यासाठी शेतकरी परराज्यातून बियाणे खरेदी करणे पसंत करीत आहेत.
जिल्ह्यात कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, जिवती तालुक्यात शेतकरी बियाणांचे दर कमी असल्याने कर्नाटकातील बिदर व तेलंगाणातील बेला, आदिलाबाद, निर्मल बाजारपेठेकडे वळले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा बि-बियाणे, किटकनाशके यांच्या किंमतीत ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना उत्पादन झाले असले तरी उत्पादनाला आवश्यक तेवढा भाव मिळाला नाही. त्यातून त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले. कर्जाच्या वाढत्या बोझ्यामुळे व बँकांच्या तगाद्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक, अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. बँकांकडून ३१ जुलैपर्यत कर्जाचे वाटप केले जाणार आहे. मात्र पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांनी उसणवारी व प्रसंगी खासगी सावकाराकडून हंगामसाठी पैसे घेतले आहेत. या पैशातून बि-बियाणे व खते खरेदी करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. अशातच राज्यात ‘महाबीज’ च्या बियाणांची दरवाढ घोषित झाल्याने शेतकरी हादरून गेला आहे. बियाणांच्या वाढलेल्या दरामुळे पारंपरिक कृषी बाजारपेठांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. थोड्याफार पैशांची बचत होईल, या आशेनं शेतकरी बियाणे खरेदीसाठी तेलंगणा व कर्नाटक राज्याची वाट धरीत आहेत. हे शेतकरी आदिलाबाद, नांदेड मार्गे कर्नाटकातील बिदर येथे पोहचत आहेत.

Web Title: Farmers run in Karnataka, Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.