घनश्याम नवघडे
नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धानाचे भाव वाढत आहेत. या आठवडयात गुरूवारी व शुक्रवारी २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोचला. शिवाय, खरेदीची प्रक्रीया सोपी असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल वाढू लागला आहे.
असेच चित्र राहिल्यास आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी व पणन महासंघाच्या धान खरेदीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्ह आहेत.
मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आला. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायट्यांकडे धान विक्रीसाठी शेतक-यांचा कल वाढला होता. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी तालुक्यात आठ आदिवासी सोसाट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. यावर्षीही हंगामाच्या प्रारंभीच ३ हजार ९४० शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ९ सोसायट्यांकडे नोंदणीही केली होती. शिवाय, आदिवासी विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या ९ सोसायट्या व पणन महासंघाकडून धान खरेदीचा प्रारंभही करण्यात आला होता. मात्र, कृउबासमध्ये गुरूवारपासून अचानक चांगल्या धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत गेला. परिणामस्वरूप, शेतकऱ्यांचा कल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरामध्ये थोडी तफावत असली तरी सोसायट्या व पणन महासंघाकडे धान विक्रीला ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात. कृउबासमध्ये असा प्रकार घडत नसल्याने शेतक-यांचा प्रतिसाद वाढत आहे.
बॉक्स
नागभीड तालुका धानाचे कोठार
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. त्यामुळे तालुक्याला धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी काढत असतात. धानाची खरेदी व विक्री मार्च महिन्यापर्यंत जोरात असते. त्यानंतर जूनव जुलैपर्यंत या व्यवहारात थोडी तेजी येत असते असा आजवरचा अनुभव आहे.
कोट
गुरूवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. बाजार समितीत कोणत्याही प्रक्रियाही पार पाडाव्या लागत नाही. कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान सुरक्षित असतात.भाव वाढण्याची आणखी शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीत यावर्षी विक्रमी खरेदी होणार आहे.
- आवेश पठाण, सभापती कृउबास, नागभीड.