गांगलवाडी : ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१८ मध्ये पीक विमा काढला व यावर्षी या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वे करून हा भाग दुष्काळग्रस्त घोषित केला. परंतु या तालुक्यातील शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित होते. मात्र आता त्यांना २०१८ च्या पीक विम्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.
या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळावी, याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्याची मुख्यमंत्री ठाकरे यांनी गांभीर्याने दाखल घेतली असून ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनातर्फे कार्यवाही सुरू केल्याची माहिती आहे. संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून धीर दिला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१८ मधील पीक विमा मिळेल.
विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात १५१ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. यात ब्रम्हपुरी तालुकादेखील समाविष्ट करण्यात आला. परंतु आज दोन वर्षांचा कालवधी लोटूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. दरम्यान, या भागातील शेतकरी सुनील जयराम शेंडे यांनी पुढाकार घेऊन या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आता शासनातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे सुनील शेंडे यांना कळविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.