मागणी : दस्तावेजात खोडतोडशंकरपूर : माना समाजाच्या हितसंबंधाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात शासनाच्या अधिकाऱ्यांनी दस्तावेजात खोडतोड करून ते सादर केले. त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल झाली. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ आदिवासी माना जमात कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन त्यात पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा बिगूल फुंकला. १ आॅगस्टला या विषयात तक्रार करण्यात येणार आहे.माना समाजाला अनुसूचित जमात प्रमाणपत्र मिळण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यात न्यायालयाने शासनाला माना जमाती संदर्भातील सर्व परिपत्रके मागविली होती. या परिपत्रकात व इतर दस्तावेजामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांनी खोटे दस्तावेज सादर केले, तर काही दस्तावेजामध्ये अधिकाऱ्यांनी खोडतोड केली. त्यामुळे माना समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. न्यायालयाने ही सर्व परिपत्रके रद्द केली आहेत. न्यायालयाची तसेच माना समाजाची शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली. अशा अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत व भारतीय दंड संहितेच्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी ३१ आॅगस्टला चिमूर पोलीस ठाण्यात समितीचे संयोजक नारायण जांभुळे तक्रार दाखल करणार आहेत. हे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे, त्यांनी आपआपल्या गावातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला नारायण जांभुळे, तुकाराम नन्नावरे, संजीव शेरकर, भारत जांभुळे, सुधाकर नन्नावरे उपस्थित होते. (वार्ताहर)
संबधीत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: August 28, 2014 11:43 PM