शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ रिक्त पदे ३१ मार्चपर्यंत भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:58+5:302020-12-23T04:24:58+5:30
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सर्व ३१ रिक्त पदे मार्च २०२१ पर्यंत भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ...
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सर्व ३१ रिक्त पदे मार्च २०२१ पर्यंत भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त पदांमुळे वैद्यकीय सेवा व वैद्यकीय शिक्षणावर अनिष्ट परिणाम होत असल्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते. विधानसभेत पुरवणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या मुद्दयांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळासाठी जमीन हस्तांतरण फेरप्रस्तावाबाबत चर्चा तसेच विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनांची २०१८-१९ व २०१९-२० ची शिक्षण थकित शुल्क प्रतिपूर्ती रक्कमेसाठी ५०० कोटी वितरीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. यावेळी अपर मुख्य सचिव, विमान चालन विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव उपस्थित होते.