नागभीड : लोकनियुक्त प्रशासक मंडळाचा कार्यकाळ संपल्यामुळे १६ आॅगस्टच्या आदेशान्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर लगेच २६ आॅगस्टच्या दुसऱ्या आदेशानुसार नागभीड कृउबासवर स्थानिक लोकांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने ००८१४/प्र.क्र. २५९/११-स या अन्वये हे आदेश निर्गमित केले असून सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांना या आदेशान्वये अवगत करण्यात आले आहे. या आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार सभापती म्हणून प्रफुल्ल देविदास खापर्डे यांची नियुक्ती करण्यात आली असून रमेश घुग्घुसकर यांची उपसभापतीपदी वर्णी लागली आहे. तर सदस्य म्हणून पुरुषोत्तम संभाजी बगमारे, अशोक गोविंदा ताटकर, संजय कृष्णाजी उरकुडे, सुधाकर वासुदेव अमृतकर, अरुण गोपाळा गोंगल, भीमराव शिवराम मेशाम, बाबुराव गोमाजी सयाम, संतोष गोविंदा सोनुले आणि रमेश सदाशिव काळे यांचा समावेश आहे.सहा वर्षा अगोदर या बाजार समितीवर चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण नंतरच्या काळात अंतर्गत कलहामुळे दोन सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येवून तो पारित करण्यात आला. शेवटच्या अडीच-तीन वर्षात या बाजार समितीचे सभापतीपद युवाशक्तीकडे होते. अविश्वास प्रस्ताव आणि कोर्ट कचेऱ्या यामुळे ही बाजार समिती वादग्रस्त बनली. त्यामुळे बाजार समिती गेल्या तीन- चार वर्षात चांगलीच चर्चेत राहिली. लोकनियुक्त प्रशासक मंडळाचा कार्यकाल संपल्याच्या सबबीखाली गेल्याच आठवड्यात नागभीडचे उपनिबंधक एम.ई. भगत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या घडामोडीनंतर पुन्हा नवीन काय घडते, याकडे नागभीड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागभीड बाजार समितीवर अखेर अशासकीय प्रशासक मंडळ
By admin | Published: August 30, 2014 1:21 AM