जिवती : टेकामांडवा येथे अचानक लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तीन घरे जळून खाक झाली. त्यात काही जनावरांचाही मृत्यू झाला. आमदार सुभाष धोटे यांनी टेकामांडवा येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली.
तालुक्यातील टेकामांडवा येथील परशुराम सोलंकर, सुरेश सोलंकर आणि शिवशंकर तरडे यांच्या घराला रविवारी अचानक आग लागली. यात तिन्ही घरे जाळून खाक झालीत. एवढेच नाही तर घरी बांधून असलेले जनावरेही आगीत जळून मृत्यू पावले. घरी कोणताही व्यक्ती हजर नसल्याने जीवितहानी मात्र टळली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, आजच्या परिस्थितीत तिन्ही परिवार उघड्यावर पडले आहेत. आज स्थानिक आमदार सुभाष धोटे, जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे, वन विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळवून देण्याची हमी दिली.