तणस वाहून नेण्याच्या पिकअप गाडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:25+5:302021-02-18T04:51:25+5:30
सास्ती : जनावरांचा चारा घेऊन पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या पिकअप गाडीला शेतशिवारात जाताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन ...
सास्ती : जनावरांचा चारा घेऊन पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या पिकअप गाडीला शेतशिवारात जाताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन आग लागली. यात संपूर्ण तणस जळून खाक झाली, तर पिकअप गाडीचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी चालकाचे हात भाजून तो जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी घडली.
सध्या जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे. त्याकरिता झाडीपट्टीतून धानाची तणीस जनावरांचा चारा म्हणून आपल्या भागात आणली जाते. बुधवारी सकाळी असाच चारा घेऊन पोंभूर्णा येथून पिक अप गाडी ( एम एच ३४ बि जी ०६२०) गोवरी येथे आली. गोवरी येथील शेतकरी ऋषी लांडे यांनी ही तणीस आपल्या शेतात नेताना पांदण रस्त्यावर असलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन अचानक आग लागली. आग लागताच परिसरातील शेतकऱ्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. राजुरा येथून अग्निशामन दलालासुद्धा पाचारण करण्यात आले; परंतु या पांदण रस्त्याने अग्निशामन दलाची गाडी पोहोचू शकत नसल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास मोठी अडचण निर्माण झाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले; परंतु गाडीतील तणीस वाचवू शकले नाही, तर गाडीचेही मोठे नुकसान झाले. यात गाडीचालकाचे हात भाजून तो जखमी झाला आहे. या घटनेत गाडीचे व शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, मदतीची मागणी केली जात आहे.