लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काहींना म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा जीवघेणा आजार होणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. मात्र आरोग्य यंत्रणेने प्रभावी पाऊल उचलल्याने कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसही जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर लागला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ९५ रूग्ण होते. उपचारानंतर काहींना सुट्टी देण्यात आली. सध्या ४५ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या आजारामुळे एकाचे डोळे काढावे लागले तर तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख कमालीचा घसरला आहे. मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा आजार काहींना जडू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. या आजारावरील उपचार व औषधी अत्यंत महाग असल्याने राज्य शासनाने महात्मा फुले आरोग्य विमा योजनेत समाविष्ट केला. रूग्णांची संख्या वाढत असताना एम्पोटीसिरीन-बी औषध चंद्रपुरातील कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नव्हते. त्यामुळे रूग्णांच्या कुटुंंबियांना धावाधाव करावा लागत होता. राज्य शासनाने हे इंजेक्शन पुरविण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे दिली. त्यामुळे रूग्णांच्या अडचणी दूर होऊ लागल्या. दरम्यान, कोरोना बाधितांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४५ रूग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाकडे आहे. यापैकी तूकूम येथील क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये १४ रूग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात पाच तर अन्य रूग्ण चंद्रपुरातील विविध खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोना रिकव्हरी रेट कमी झाला, मात्र संसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणेसायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत काळी बुरशी साठून राहते. नाकातून रक्त येऊ शकते. मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी होते. डबल व्हिजन म्हणजे एखादी गोष्ट दोन दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. मात्र, ज्या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी प्राणघातक ठरू शकते.
अशी घ्या काळजीअनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णांवर स्टेराईडचा वापर करताना काळजी घ्यावी. शरीरातील सारखेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. कोविड रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतर सकस आहार घ्यावा, असा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला.
औषधींवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रणम्युकरमायकोसिस रूग्णांना इंजेक्शन व औषधी पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिली. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आले. मागणी नोंदविल्यानंतर उपलब्धतेनुसार इंजेक्शन थेट रूग्णांना पुरविले जात आहे.
तिघांचा मृत्यू ; एकाचा डोळा काढलाचंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस झालेल्या तिघांचा रूग्णांचा मृत्यू झाला तर एकाचा डोळा काढावा लागला. कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर लागला आहे. मात्र हा आजार होऊ नये अथवा झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सध्या ४५ रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इंजेक्शन व औषधांचा तुटवडा नाही. मात्र, मागणीनुसारच रूग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही कमी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकता न राहता स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घ्यावी.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर