नागभीड : वनपरिक्षेत्र कार्यालय नागभीड, तळोधी यांच्या संयुक्त विद्यमाने घोडाझरी अभयारण्यातील नाल्यावर वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड यांचे नेतृत्वाखाली वनराई बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे वन्यजीवांची तृष्णातृप्ती होणार आहे.
घोडाझरी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा संचार आहे. घोडाझरी तलावात या वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध असले तरी अभयारण्याचा विस्तार लक्षात घेता अनेक छोट्या वन्यजीवांना तलावापर्यंत पोचण्यासाठी अनेक अडथळे पार पाडावे लागतात .या वन्यजीवांना सहज पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने या वनराई वंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक उईके, वाळके, सय्यद व अन्य वनकर्मचारी उपस्थित होते.
फोटो
ब्रह्मपुरीत वनकर्मचाऱ्यांनी बांधला वनराई बंधारा
ब्रह्मपुरी : वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या उपक्षेत्र नवेगावमधील नियतक्षेत्रातील मुरपार येथील कक्ष क्रमांक १६४ मधील नाल्यावर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे.
हिवाळा संपताच उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता भविष्यात जंगलव्याप्त परिसरात वन्यप्राण्यांना तथा वन्यजीवांना दीर्घकाळापर्यंत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील नवेगाव नियतक्षेत्रात श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी बोगाळे, उत्तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पुनम ब्राम्हणे, क्षेत्र सहाय्यक आर एम सुर्यवंशी, एम एच सेमस्कर,डब्ल्यू एल नवघडे, नेचर एनवारमेंट अँड वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशनचे सुशील थारकर, उमाकांत मेश्राम आदींची उपस्थिती होती.