बंगाली कॅम्प परिसरात वाहनधारकांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या चार वाहनचालकांवर बुधवारी दुपारी ४ वाजता शहर पोलिसांनी बंगाली कॅम्प परिसरात कारवाई केली. वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला.
दादमहल वाॅर्डातील
नाल्या घाणीने तुंबल्या
चंद्रपूर : दादमहल वाॅर्डातील नाल्यांमध्ये घाण साचली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही वाॅर्डांमध्ये नालीचे बांधकाम अर्धवट असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधक नसल्याने
अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु, बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने गतिरोधक बांधण्यांची मागणी आहे.
गंज वाॅर्डातून जड
वाहतूक बंद करावी
चंद्रपूर : गंज वाॅर्डात भाजीपाला, धान्य बाजार, सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँका आहेत. याच परिसरातील सिटी हायस्कूल, हिंदी सिटी हायस्कूल, ज्युबिली हायस्कूल, काही मंगल कार्यालयेही आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जड वाहने रस्त्यावर उभी करून नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातग्रस्त स्थळांवर
फलक लावावे
चंद्रपूर : शहरातील अपघातप्रवण स्थळांवर फलक नसल्याने धोका आहे. फलकाअभावी वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी या स्थळांवरील फलक नागरिकांनी चोरून नेले. जागरूक नागरिकांनी ही माहिती मनपाला दिली. मात्र, अद्याप नवीन फलक लावण्यात आले नाही.
शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा
गोंडपिपरी : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. पण, विम्याची रक्कम मिळाली नाही. अतिपावसामुळे खरिपातील धानाचे पीक वाया गेले होते. विमा काढणारे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून आहे.
जलनगरातील पथदिवे
दुरुस्त करावे
चंद्रपूर : शहरातील जलनगर परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही खांबांचे दिवे फ्युज झाले तर काही दिवे फुटले आहेत. त्यामुळे या खांबाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
११ हजार जुने वीज
मीटर बदलविले
चंद्रपूर : नवीन वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त झालेले वीजमीटर बदलून घेण्यासाठी मीटरच्या उपलब्धतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केली जात होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज मीटर बदलवून देण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरण कंपनीकडून जिल्ह्यात ११ हजार नवे मीटर उपलब्ध करून दिले आहेत.
सुमित्रानगरात भुरट्या
चोरांचा धुमाकूळ
चंद्रपूर : तुकूम परिसरातील सुमित्रा नगरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ सुरू केला. रात्री काहींच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू चोरून नेण्याच्या घटना वाढत आहेत. चोरलेल्या वस्तू भंगारात विकल्याचा प्रकारही गत आठवड्यात उघडकीस आला होता.