घरकुलांसाठी ५३ कोटींचा निधी लवकरच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:57+5:30
रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरित सात हजार ४६२ घरकुलांचे कामे विविध स्तरावर अपूर्ण आहेत.
सामाजिक न्याय मंत्र्यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकूल बांधकामाकरिता ५३ कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान येत्या आठ दिवसांत हा निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.
यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरित सात हजार ४६२ घरकुलांचे कामे विविध स्तरावर अपूर्ण आहेत.
तसेच सन १०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता चार हजार ९४ लाभार्थींची निवड प्राप्त असून आॅनलाईन मान्यता देण्याची प्रक्रियासुध्दा पूर्ण झाली आहे. मात्र निधी नसल्याने घरकुलांची कामे खोळंबलेली आहे. यासाठी ५३ कोटी २२ लक्ष २० हजार रूपयांचा इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.