स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला होते अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:22 AM2019-06-06T00:22:08+5:302019-06-06T00:22:25+5:30
जन्मभर जळल्यावरही मेल्यानंतर जळतात, लाकडापेक्षाही माणसंच लाकडाचे गुणधर्म पाळतात, ही चारोळी कदाचित चिमूर तालुक्यातील बंदरवासीयांसाठी तयार करण्यात आली की काय, असा प्रश्न पडतो, कारण येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अनुवयास मिळते.
आशीष गजभिये।
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : जन्मभर जळल्यावरही मेल्यानंतर जळतात, लाकडापेक्षाही माणसंच लाकडाचे गुणधर्म पाळतात, ही चारोळी कदाचित चिमूर तालुक्यातील बंदरवासीयांसाठी तयार करण्यात आली की काय, असा प्रश्न पडतो, कारण येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अनुवयास मिळते.
माणसाला जन्म आहे तर मृत्यू आहे. यातून कुणाचीही सुटका होऊ शकत नाही. अंतिम श्वास घेतल्यानंतर स्मशानघाटाकडे प्रवास सुरु होतो, या प्रवासात आप्त-सगेसोयरे, मित्रमंडळीची रांग असते. पण बंदर (शिवापूर) गावातील जगाचा निरोप घेतलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना आप्तस्वकीयांना अडचणीचे जात आहे. स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला मृतकांवर अंत्यस्कार करावा लागत आहे.
देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७३ वर्ष झालीत. पण आजही गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. चिमूर तालुक्यातील बंदर (शिवापूर) या गावात अनेक समस्या आहेत. प्रमुख समस्या ही की चक्क स्मशानभूमीच नाही. परिणामी येथील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वनविभागाच्या जंगलालगत उघड्यावर मृतदेह जाळावा लागतो. पावसाळ्याच्या काळात ग्रामस्थांची तारांबळ उडते. पावसामुळे कधी मृतदेह अर्धवट जळतो, त्या मृतदेहास पाऊस थांबल्यानंतर जाळवा लागतो. गावात मृत्यूनंतरही मृतत्म्याची अवहेलना होत असल्याने ग्रामस्थांनी कित्येक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाव
निर्मल ग्रामस्वराज्य उपक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २००८ ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. शासनाकडून राबविल्या जाणाºया प्रत्येक उपक्रमात सहभागी घेऊन जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्वच्छ अंगणवाडी, स्वच्छ शाळा यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
शासनाने लक्ष द्यावे.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सुरुवातीला गांभीर्याने लक्ष घातल्याने गावात काही प्रमाणात विकासकामे झालीत. गावाचा चेहरामोहरा बदलला. परिणामी गावही शासनाचे उद्देश सार्थकी लावण्यात विविध उपक्रमात सहभागी होऊ लागले. पण मागील काही काळापासून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे गावाचा विकास रोडवला असून अनेक मूलभूत समस्यांची वानवा आहे.