हितेश मडावी : मराठा सेवा संघाद्वारे स्मृतीदिन कार्यक्रम
चंद्रपूर - गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दिनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा होय असे मत प्रा. हितेश मडावी यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाद्वारे कर्मयोगी गाडगेबाबा स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सुधाकर खरवडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भवानजी भाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. हितेश मडावी, दीपक खामनकर, वनिता गाडगे-आसुटकर, विजय तुरानकर, विनोद बारसागडे आदी उपस्थित होते.
मडावी म्हणाले, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, अशी शिकवण आयुष्यभर गाडगेबाबांनी दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ त्यांचे देव होते, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सुधाकर खरवडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महादेव ढुमने, संचालन कुंदन परकारे, आभार प्रा. महेश मालेकर यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघ व सर्व कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.