शाळकरी विद्यार्थ्यांच्या हाती गांजा
By Admin | Published: August 30, 2014 11:33 PM2014-08-30T23:33:09+5:302014-08-30T23:33:09+5:30
औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आता गांजाचे शहर अशी ओळख होऊ पहात आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये गांजा खुलेआम विकत मिळत असल्याने नागरिकांसह आता
कोवळे जीव नशेच्या आहारी : चौकाचौकांत मिळतो खुलेआम गांजा
चंद्रपूर : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आता गांजाचे शहर अशी ओळख होऊ पहात आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये गांजा खुलेआम विकत मिळत असल्याने नागरिकांसह आता विद्यार्थीही गांजाच्या आहारी जात आहे. कोवळ्या वयात नशेची लत लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु असला तरी पोलीस ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने गांजा विक्रेत्याचे व त्याची नशा करणाऱ्यांचे फावत आहे. यामुळे शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य धोक्यात आले आहे. शहरात शिक्षणासाठी आलेल्या पाल्यांकडून त्यांच्या पालकांच्या अनेक अपेक्षा असतात. मात्र मात्र शिक्षणासाठी गेलेला आपला पाल्य गांजासारख्या व्यसनाच्या आहारी गेला असावा, याची पुसटशी कल्पनादेखील पालकांना नसते.
शहरात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजसह महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हिच संधी हेरून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी कष्टात पैसा कमविण्याच्या मागे लागले आहेत.
यासाठी त्यांनी गांजासारखे अंमली पदार्थ शहरात विकून माया गोळा करीत आहेत. गांजाची विक्री करणारे शहरातील काही ठराविक चौकात आपला हस्तक ठेवतात. त्याच्या माध्यमातून शौकींनाना गांजा पुरविला जात आहे.
कमी श्रमात अधिक पैसे मिळविण्याच्या नादात काही विद्यार्थीही गांजा विक्रीच्या शृंखलेत अडकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गांजा ओढल्याने आपली बुद्धी तेज होते. अभ्यास चांगला होतो. रात्री अभ्यासात मन लागते, अशी थाप गांजा विक्रेत्यांकडून मारली जात आहे. त्याला विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. काही विद्यार्थी चाचणी म्हणून एखाद्या दिवशी गांजाची नशा करतात. मात्र पुढे ही नशा त्यांना हवी-हवीशी वाटत असल्याने ते नशेच्या आहारी जात आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. (नगर प्रतिनिधी)