शासकीय ब्लड बॅंकेने पार केला १० हजार रक्त पिशव्यांचा टप्पा, चंद्रपूरात विधायक उपक्रम
By साईनाथ कुचनकार | Published: October 19, 2023 06:36 PM2023-10-19T18:36:10+5:302023-10-19T18:36:49+5:30
रक्तदात्यांचे सहकार्य : ब्लडबॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: मागील काही दिवसांमध्ये राज्यभरातील शासकीय आरोग्य व्यवस्थेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लड बॅंकेने रुग्णांसाठी चांगले काम केले आहे. मागील दहा महिन्यांमध्ये रक्तदात्यांकडून रक्तदानाच्या माध्यमातून तब्बल १० हजार रक्त पिशव्या गोळा केल्या असून त्या वेळोवेळी गरजवंत रुग्णांना पुरविल्या आहेत. त्यामुळे सध्या येथील ब्लड बॅंकेतील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसह रक्तदात्यांचेही कौतुक केले जात आहे.
मंगेश निकोडे हे या वर्षातील दहा हजारवे रक्तदाते ठरले आहेत. औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथील रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठ्या संख्येने गर्दी असते. अपघात, विविध आजारी रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज असते. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, रक्तदात्यांना आवाहन करून रक्तदान शिबिर तसेच स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेतले जात आहे. याचा परिणाम म्हणजे, येथील ब्लड बॅंकेमध्ये सध्या रक्ताचा बऱ्यापैकी साठा शिल्लक आहे. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांना रक्त पुरवठा करणेही सहज शक्य होत आहे. १ जानेवारी २०२३ ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये या ब्लड बॅंकेने १० हजार रक्त पिशव्यांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, दहा हजारावे रक्तदाता मंगेश निकोडे यांनी स्वत: ब्लड बॅंकेमध्ये येऊन रक्तदान केले आहे.
ब्लड बॅंकेमध्ये यांचा आहे समावेश
शासकीय ब्लड बॅंकेमध्ये ब्लड बॅंक अधिकारी म्हणून डाॅ. नितीन टिपले हे काम बघत आहेत. तर ब्लड बॅंक पीआरओ म्हणून पंकज पवार तसेच अन्य कर्मचाऱ्यांमध्ये अमोल जिड्डेवार, अनिल पिंगे, उत्तम सावंत, आनंद चव्हाण, अमोल रामटेके, आशिष कांबळे, लक्ष्मीकांत गाखरे, गुणवंत जाधव, सोनी मेश्राम, परिचारक सुहास भिसे आदींचे सहकार्य लाभले आहे.
या डाॅक्टरांचा समावेश
पॅथाॅलाजी विभाग प्रमुख म्हणून डाॅ. शैलेंद्र जांभूळकर काम बघत आहेत. तर ब्लड बॅंकेमध्ये डाॅ. स्वाती दरेकर, डाॅ. मिलिंद झाडे, डाॅ. नहिद सैय्यद, डाॅ. पल्लवी रेड्डी, डाॅ. हनुमान या डाॅक्टरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी डाॅ. प्रेमचंद यांनी सुद्धा रक्तदान करून घेण्यासंदर्भात मोठी जबाबदारी पार पाडली आहे.