प्राचीन ठेव्याबाबत सरकार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:40 PM2018-09-16T22:40:43+5:302018-09-16T22:41:14+5:30
चंद्रपूर ही प्राचीन नगरी आहे. गोंडराजाच्या काळातील अनेक प्राचीन वास्तू येथे आहेत. चंद्रपुरातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्मारके, परकोट याची दूरवस्था होत आहे. मात्र आता या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर ही प्राचीन नगरी आहे. गोंडराजाच्या काळातील अनेक प्राचीन वास्तू येथे आहेत. चंद्रपुरातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्मारके, परकोट याची दूरवस्था होत आहे. मात्र आता या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर झाले आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपूरमधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सवोर्तोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन ना. डॉ. महेश शर्मा यांनी या ैबैठकीत दिल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपूर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल (सध्याचे जिल्हा कारागृह), सराई इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जुनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील किल्ला आदी विषयावर सकारात्मक निर्णय झाले.
किल्ला व संरक्षण भिंत यामधून पाथ वे, सायकल ट्रॅक चा प्राक लॅन तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि लाईट, साऊंड शो करिता आवश्यक कामे विभाग करेल व गरज असल्यास इतर संस्थांना काम करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही या बैठकीत ठरले. जुनोना जलमहल विभागाकडे घेणे आणि सौंदर्यीकरण करणे, सराई इमारतीचे जतन करण्यास तांत्रिक सहकार्य भारतीय पुरातत्व विभाग देणार असे ठरले. पुरातत्व विभागाकडूण बांधकाम करण्यात येणार असून संग्रहालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषत: चंद्रपूरमधील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याकरिता बोलाविण्यात आलेल्या या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांच्यासह सांस्कृतिक पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभागाच्या महानिदेशक डॉ. उषा शर्मा, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, टी. जे. अलोने, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.
दोन टप्प्यात ३४ कोटी
चंद्रपूर येथील पाचशे दिवसांपासून सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने तुटलेल्या किल्ला भिंत व बुरुजे यांची त्वरित दुरस्ती करण्याकरिता टप्प्याटप्पाने बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले. किल्ल्याच्या सभोवताल सुरु असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी दोन टप्प्यात ३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.
केंद्रीय समिती करणार पाहणी
शहरातील कारागृह इतरत्र हलवून गोंडराजे राजमहल संवर्धन करून पर्यटनदृष्टया संपूर्ण परिसराचा विकास करण्याबाबत लवकरच केंद्रीय समिती पाहणी करणार आहे. सोबतच ही समिती इको-प्रो किल्ला स्वच्छता अभियान, जटपुरा गेट, जुनोना जलमहल, सराई इमारत, संग्रहालयाची पाहणी करणार आहे, अशी माहितीही ना. अहीर यांनी दिली.