‘तो’ वेदना घेऊन वाहतो आयुष्याचे ओझे !
By admin | Published: August 30, 2014 01:16 AM2014-08-30T01:16:41+5:302014-08-30T01:16:41+5:30
जीवन जगताना असंख्य अडचणी. सुख-दु:खाचा चढ-उतार. यावर मात करीत जो समोर जाणे, यालाच जीवन म्हणतात.
राजकुमार चुनारकर खडसंगी
जीवन जगताना असंख्य अडचणी. सुख-दु:खाचा चढ-उतार. यावर मात करीत जो समोर जाणे, यालाच जीवन म्हणतात. अशा सुंदर जीवनाचे स्वप्न रंंगवून पत्नी व तीन मुलांसोबत सुखाने संसार सुरु होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. रेल्वे अपघात दोन्ही पाय कटले. सात जन्माची साथ देण्याचे वचन देणाऱ्या पत्नीनेही अर्ध्यात साथ सोडली. पैसे कमविण्याचा पर्याय नाही. मात्र, जिद्द न हारता सहा वर्षीय बालिकेला घेऊन जीवनाशी संघर्ष सुरु आहे.
मन हेलावून टाकणारी ही कहाणी आहे, भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील नागेश माणिक अंबलवार यांची. नागेशचा विवाह तुलशी नामक मुलीशी झाला. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता. त्यांच्या संसार वेलीवर संतोष (९), नंदिनी (६) व नीलेश (३) अशी तीन फुले ! आपल्या परिवारासह सुखाने राहत असताना, २००९ मध्ये अचानक रेल्वे अपघात नागेशचे दोन्ही पाय कटले. त्यामुळे नागेश या अपघाताने पूर्ण खचला. माझ्या परिवाराचे काय होईल, या चिंतेने त्याला ग्रासले. काही कालावधी करीता पत्नी तुलशीने साथ दिली. मात्र सात जन्माचे वचन घेतलेल्या पत्नीनेही नागेशला सोडून दिले. तिने संतोष व नीलेश या दोन मुलांना घेऊन दुसरा आधार शोधला. पत्नी सोडून जाण्याचा धक्काही नागेशला दु:खाच्या खाईत लोटून गेला. मात्र, नागेशने जगण्याची आस सोडली नाही.
रेल्वेच्या अपघातात दोन्ही पाय गमावण्याचा दुर्दैवी प्रसंगी आल्यावरही न घाबरता तो चारचाकी गुळगुळीवर बसून आपल्या सहा वर्षीय नंदिनीसह आयुष्याचे ओझे वाहत आहे.
राहायला निवारा नसल्याने आकाशालाच नागेशने घर मानून बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा आसरा घेत आपले जीवन काढत आहे. दोन्ही पायाने अपंग असलेला नागेश पाट्याच्या तराप्याला चाके लावलेल्या पाटीवर बसून नंदिनीला मागे घेवून लोकांकडून पैसे मागत असते. नागेशची अवस्था व चिमुकल्या नंदिनीला बघून अनेकांना पाझर फुटतो व सरळ हाताने महिला, पुरुष मदत करतात. या आलेल्या मदतीनेच नागेश व नंदिनीच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होते.
आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचा बाहु करत चिंतेत राहण्यापेक्षा मनोरंजनातून काही काळ निघावा. यामुळे नागेश सिनेमा बघणे पसंत करतो. त्याने बाजीराव सिंघमच्या चित्रपटाच्या प्रेमापोटी बल्लारपूर ते चंद्रपूर असा बसचा प्रवास करुन चित्रपट बघितला. नागेशला हा सिनेमा आवडला, असे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने नागेशला बोलके केले असता, नागेशने आपली करुन कहाणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
नागेशला भेडसावत आहे ती चिमुकल्या नंदीनीची काळजी. नंदिनीचे पुढे काय होणार, याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. नागेशला दोन्ही पायाने अपंगत्व आल्यावरही व पत्नीनेही अर्ध्यातच साथ सोडली तरी तेवढ्याच हिंमतीने आलेल्या दु:खाला सामोरे जात आहे. अनेकजण दु:खाचा सामना न करता जीवन संपविण्याचा प्रयत्न करतात असे अनेक उदाहरणे बघायला मिळतात. त्यांच्यासाठी नागेश हा आदर्शच आहे.