नवरगाव (चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडलाजवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरुणावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिपर्डा बिटातील कक्ष क्रमांक ५६३ मध्ये घडली.
सर्वत्र वाघाचा धुमाकूळ असल्याने खांडला येथील गुरे चारणे गुराख्यांनी बंद केले. मात्र घरी गुरे असल्याने ते राखण्याचा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे खांडलावासीयांनी मीटिंग घेऊन आळीपाळीने रोज गावातील तीन माणसे गुरे चारण्यासाठी जातील, असे ठरल्याने अनिल पांडुरंग सोनुले, गजानन कुंभरे आणि विलास कुंभरे अशा तीन व्यक्ती रविवारची पाळी असल्याने गुरे चारण्यासाठी गेले होते. खांडला गावापासून तीन किमी अंतरावरील पळसगाव रेंजमधील पिपर्डा बिटात खरकाळ नाला परिसरात तिघे जण तीन भागांत गुरे चारत होते. अनिल उन्हामुळे पळसाच्या झाडाखाली बसला होता. त्याला ऐकू येत नव्हते. अशातच अचानक पट्टेदार वाघाने हल्ला करून सुमारे ३० मीटरपर्यंत ओढत नेले. याकडे गजानन कुंभरे यांचे लक्ष जाताच त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केली. अनिलला तेथेच सोडून वाघाने धूम ठोकली. तोपर्यंत अनिलचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेपूर्वी याच जंगलातील वाघडोह परिसरात पट्टेदार वाघाने शेळीवर हल्ला करून जागीच ठार केले. रत्नापूर बिटाचे वनरक्षक जे.एस. वैद्य व इतर पाच व्यक्ती पंचनाम्यासाठी गेले असता वाघ तेथेच बसून होता. शेवटी गावकऱ्यांना घटनास्थळी बोलाविल्यानंतर वाघ तिथून निघून गेला. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली. यासोबतच खांडलापासून दोन किमी अंतरावर सरांडी येथे वाघाने हल्ला करून सदाशिव मोहुर्ले यांची शेळी ठार केली. ही घटना २.३० वाजताच्या सुमारास घडली. तीनही घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने सदर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. अनिलच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असून तो घरातील कमावता व्यक्ती होता.
महिला वनरक्षकांनी नदी ओलांडून गाठले घटनास्थळ
घटनास्थळ पिपर्डा बिटात असून येथे येण्यासाठी उमा नदी पडते. शिवाय नदीला साडेतीन ते चार फूट पाणी वाहत आहे. मात्र वाघाने माणसाला मारले असल्याने प्रथम घटनास्थळी पोहोचणे हे आपले कर्तव्य समजून पिपर्डा बिटाच्या वनरक्षक सीमा ठाकरे यांनी उमा नदीच्या पाण्यातूनन वाट काढत घटनास्थळ गाठले.
200921\img_20210919_163355.jpg
याच ठिकाणी मारल्यानंतर नागरीकांनी गर्दी केली