चंद्रपूर : शेतात पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना मोजणीला विरोध करीत शेतकऱ्याने त्याच ठिकाणी विष प्राशन केले. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या शेतकऱ्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
वरोरा तालुक्यातील वंदली येथील मारुती महादेव चौधरी यांचे खडक तांगडी रीठामध्ये ५.१६ हेक्टर शेत आहे. त्यातील दोन हेक्टर शेत एका व्यक्तीकडे ठेवून खासगी कर्जाची उचल केली. कालांतराने खासगी कर्ज त्यांनी त्या व्यक्तीस परत केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर खासगी कर्ज देणारी व्यक्ती शासकीय मोजणी करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होती. यापूर्वी मोजणीला विरोध झाल्याने ते परत गेले. त्यानंतर बुधवारी पोलिस बंदोबस्तात पुन्हा मोजणी सुरू केली. मोजणी सुरू असताना मोजणी करू नका व मी ताबा देणार नाही, असे मारुती महादेव चौधरी वारंवार सांगत होते. याबाबत वरोरा पोलिस स्टेशन व भूमिअभिलेख कार्यालयाला मोजणी करू नका, असे लेखी पत्र दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. मोजणी सुरू असताना मारुती महादेव चौधरी यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.
उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तरी मारुती महादेव चौधरी यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. आता याबाबत पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.