धानोरातील हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Published: January 9, 2017 12:37 AM2017-01-09T00:37:02+5:302017-01-09T00:37:02+5:30
चंद्रपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर दोन हजारावर लोकवस्तीचे धानोरा (पिपरी) गाव आहे.
अस्तित्व धोक्यात : पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारकाकडे दुर्लक्ष
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
चंद्रपूर तालुक्याच्या ठिकाणापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर दोन हजारावर लोकवस्तीचे धानोरा (पिपरी) गाव आहे. वर्धा नदीच्या तिरावरील या गावात पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्या अत्यंत कोरीव व देखण्या मूर्ती आहेत. पंचक्रोशीत गावकऱ्याचे कुलदैवत म्हणून ओळख आहे. नागपूर विभागात पुरातत्व विभागाने या मंदिराला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले आहे. मात्र या स्मारकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ब्रम्हा, विष्णू व महेश या मूर्र्तींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धानोरा (पिपरी) येथील पुरातन हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या माार्गावर आले आहे.
धानोरा (पिपरी) गावात शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. येथील नागरिक नागपंचमीला येथे पूर्वी पूजा-अर्चा करुन कुलदैवताचे नामस्मरण करीत होते. ब्रम्हा, विष्णू, महेशच्या चरणी नतमस्तक होवून मनोकामना पूर्ण करीत होते. वर्धा नदी जवळ असल्याने हेमाडपंती पुरातन मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे. गावकऱ्यांचे भक्ती भावाने दर्शन घेण्याचे मंदिर चांगले असावे म्हणून जिर्णोधार करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. मात्र पुरातत्व विभागाची अडचण समोर आली. संरक्षित स्मारक म्हणून कोणतेही काम करण्यास मज्जाव करण्यात आला. येथील नागरिकांनी आपआपली सुख, दु:ख ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या साक्षीने अनुभवली. पिढ्यानपिढ्या मनोभावे पुजा अर्चना, कीर्तन करुन मनोकामना जपली. त्याच कुलदैवताची दुर्दशा गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. याला कारणीभूत पुरातत्व विभागाचा दुर्लक्षितपणा असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने धानोरा येथील पुरातन हेमाडपंथी मंदिराला संरक्षीत स्मारक म्हणून केवळ फलक लावला. त्यावर प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा १९५८ अंतर्गत हे स्मारक राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित केले असून सुधारणा व वैधता कायदा २०१० नुसार प्रतिबंधीत केले आहे. १०० ते २०० मीटर पर्यंत कोणतेही खोदकाम, बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी गावकऱ्यांच्या भावनेला आळा बसला आहे.
पुरातत्व विभाग हेमाडपंथी मंदिराच्या अवशेषाकडे दुर्लक्ष करीत असून संरक्षित स्मारकाला गत वैभव प्राप्त करुन देण्यास काहीच हालचाल करीत नाही. यामुळे पुरातन हेमाडपंथी शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर सद्यस्थितीत अडगळीत पडले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे पुरातन मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर असून मंदिराची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच हरिभाऊ गोखरे व उपसरपंच उत्तम आमडे यांनी केली.
मंदिराला गत वैभव मिळावे
धानोरा गावात सर्वात जुणे शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर आहे. पुरातन मंदिराचा जिर्णोधार करण्याचा व नव्याने मूर्तीच्या संरक्षणासाठी व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बांधकाम अपेक्षित आहे. ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग केवळ फलक लावून मोकळा झाला. यामुळे भाविकात नाराजी आहे. पुरातन हेमाडपंथी मंदिरापुळे गावाचे मोठेपण सिद्ध होणार असून वास्तुचे जतन होणे गरजेचे आहे.
- नंदू वासाडे, माजी संचालक कृउबा समिती
दर्शनाला ठरत आहे धोकादायक
गावातील शंकराचे व ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिर जीर्ण झाले आहे. यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी जीव मुठीत घेवून गाभाऱ्यात जावे लागते. अत्यंत कोरीव व सुरेख मूर्र्तींचे अवशेष लुप्त होण्याच्या माार्गवर आहेत. नागपंचमीला दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिर परिसरात होते. एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे पुरातत्व विभागाने मंदिराच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
- विजय आगारे, सामाजिक कार्यकर्ता, धानोरा