प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:28 AM2021-09-11T04:28:25+5:302021-09-11T04:28:25+5:30
भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने ...
भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने व्यापारी वर्गाची व नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावातील नागरिकांना खुल्या जागेवरच लघुशंकेसाठी जावे लागते. भिसीत शनिवारी बाजार भरतो. बाजारासाठी १५-२० गावांतून नागरिक भिसीला येतात. बाजार चौकात कुठेच प्रसाधनगृह नसल्याने बाहेरील नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. जिथे जागा मिळेल, तिथे लघुशंका आटोपली जाते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.
सॅनिटायझरची विक्री घटली
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्के सॅनिटायझरची विक्री घटली असल्याची माहिती आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
नेटपॅकचे दर कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना नेट पॅक मारावा लागत आहे. साधरणत: अडीचशेच्या जवळपास खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात नेटपॅक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या उपसा न केल्याने तुडुंब भरलेल्या आहेत.