सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:54+5:30
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुलै महिन्यात सातत्याने पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे. जुलै महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा मोठ्या जलाशयात एकूण सरासरी ६०.४८ टक्के पाण्याची साठवणूक झाली आहे. डोंगरगाव प्रकल्प तर आताच ओव्हरफ्लो झाला आहे तर आसोलामेंढा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव यामध्ये पाण्याची साठवणूक होऊ लागली आहे. जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी बघितले तर ६०.४८ टक्के जलसाठा झाला आहे. या सिंचन प्रकल्पांवर खरीप आणि रबी दोन्ही हंगामाची धुरा असते. आता जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंतच या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकरी आनंदले आहे.
डोंगरगाव प्रकल्प ओव्हरफ्लो
जिल्ह्यातील दहा प्रकल्पांपैकी डोंगरगाव सिंचन प्रकल्प आताच ओव्हरफ्लो झाला आहे. तर असालामेंढा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सध्या ९२.७२ टक्के जलसाठा आहे. येत्या काही दिवसात आसोलामेंढा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.