वाघाच्या दहशतीत शिक्षणाचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:35 AM2019-02-22T00:35:51+5:302019-02-22T00:36:43+5:30
तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे. या परिस्थितीत पद्मापूर येथील पाचवी ते सातवी या वर्गातील २३ विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून तीन किमी अंतरावरील भूज येथील शाळेत पाय जावे लागत आहे. वाघाच्या दहशतीत ते शिक्षणाची वारी करीत आहे.
पद्मापूर-भूज गट ग्रामपंचायत आहे. पद्मापूरची लोकसंख्या ६८० आहे. या गावात वर्ग पहिली ते चवथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहे. मात्र इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी तीन किमी अंतरावर असलेल्या भूज येथील शाळेत जावे लागते. पद्मापूर-भूज या मार्गावर अनेकदा सकाळी आणि सायंकाळी सातत्याने पट्टेदार वाघाचे दर्शन होते. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक धजावत नाही. त्यामुळे २२० दिवसांपैकी जवळपास १०० दिवसांची शाळा बुडते. रात्री गावात पोहोचायला विद्यार्थ्यांना उशीर व्हायला नको, यासाठी अंधार पडायच्या आत ४ वाजताच शाळेला सुटी दिली जाते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पद्मापूर येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतावर काम करीत असलेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. १८ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास पद्मापूर-भूज मार्गावर वाघाने तळ ठोकला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच जाऊ शकले नाहीत.
१ मार्चपासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावर पट्टेदार वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत बस उपलब्ध आहे. परंतु तिची आणि शाळेची वेळ जुळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करीतच शाळेत जावे लागते.