लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मागासवर्ग आयोगाद्वारे समिती नेमून त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे मान्य केले. त्यामुळे कुणबी समाजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या मागासलेला असल्याने या समाजाला १२ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी धनोजे कुणबी समाजाने केली आहे. यासंदर्भात लवकरच आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी दिला आहे.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण घोषित केले. न्यायालयीन लढाईत उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण पूर्णपणे वैद्य ठरवत ते १२ ते १३ टक्के करण्यात यावे, अशी सूचना राज्य सरकारला केली. राज्य सरकारने आपल्या अधिकारात या सत्रापासून शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात आरक्षण तत्काळ लागू करावे, असा आदेश दिला आहे.लवकरच आंदोलन आपसातील मतभेद, पोट जातीतील भेद विसरून आरक्षणासाठी एकत्र येऊन भक्कम लढा उभा करण्याची गरज आहे. चंद्रपुरात या प्रश्नावरून लवकरच आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.आर्थिक मागासलेपण महाराष्ट्रात बहुसंख्येने असणारा व पूर्वजात कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणारा कुणबीसमाज आज दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहे. कुणबी समाजातील बहुसंख्य जनता ही उच्च शिक्षणापासून वंचित आहे. खेड्यात अल्पभुधारक शेतमजूर आणि शहरात झोपडपट्टीमध्ये मोलमजुरी करणारा अशी समाजाची अवस्था आहे.
कुणबी समाजालाही १२ टक्के आरक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:33 PM