चंद्रपुरात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:05 AM2019-08-16T04:05:44+5:302019-08-16T04:06:15+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून, त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत.
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून, त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकायार्तून आगामी पाच वर्षांत जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व नियोजन तथा वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालयात मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्याला खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.
‘चांदा’ कृषी मोबाइल अॅपचे उद्घाटन
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर ‘चांदा’ या कृषी अॅपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्यावतीने ‘चांदा’ कृषी मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपमार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना, तसेच लाभार्थ्यांची माहिती, कृषी विषयक सल्ला, शेतकऱ्यांनी साकारलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा याबाबतची माहिती यात उपलब्ध होणार आहे.