चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:01 PM2020-09-28T17:01:08+5:302020-09-28T17:01:29+5:30

वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या लोंढोली बीटातील कक्ष क्रमांक १५३४ मध्ये जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Leopard dies in wildlife clash in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसावली तालुक्यात महिनाभरातील दुसरी घटना


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या लोंढोली बीटातील कक्ष क्रमांक १५३४ मध्ये जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा बिबट दोन वर्षांचा आहे. बिबट्याचा मृत्यू वन्यप्राण्यांच्या झुंजीत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. सिरसी येथील वनरक्षक चौधरी यांना गावकऱ्यांनी घटनेची माहिती दिली. सावली तालुक्यातील अंतरगाव येथे महिनाभरापूर्वी नवभारत विद्यालयाच्या परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच बिबट्याच्या मृत्यूची दुसरी घटना घडली.

मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कापसी गावातील दहा वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. त्यातच आज बिबट्याचा मृत्यूदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या मृत्यूची माहिती होताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत झालेल्या बिबट्याच्या मानेला, पोटाला जखमा आढळून आल्या, तर नख व दात तुटलेले होते. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या झुंजीमध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत बिबट मादी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबटाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण पुढे अशी माहिती वन विभागाने दिली आहे.

सावली तालुका जंगलव्याप्त असून अनेक हिंस्र पशुंचा या परिसरात वावर आहे. या परिसरात वाघ व बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून वन्य प्राण्यांच्या झुंजी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेचा तपास सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी यांच्या मार्गदर्शनात उपवनपरी क्षेत्र अधिकारी बुराडे व वनकर्मचारी करीत आहेत.

Web Title: Leopard dies in wildlife clash in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.