चंद्रपुरात सोमवारपासून देणार बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:36+5:30

१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा हा टप्पा २५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याकरिता जिल्हाभरात ६९ केंद्र तयार केले. सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोज वितरित करण्यात आले. १३ मार्चला पहिल्यांदाच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले.

The long awaited dose of 'Covacin' vaccine will be given in Chandrapur from Monday | चंद्रपुरात सोमवारपासून देणार बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोज

चंद्रपुरात सोमवारपासून देणार बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोज

Next
ठळक मुद्देफक्त ४ हजार ८०० डोस उपलब्ध : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्रोझेनिकने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोज देणे सुरू आहे. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात हैदराबादची भारत बायोटेक व आयएमसीआर निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे ४ हजार ८०० डोज पाठविले. ही लस अत्यंत संवेदनशील असल्याने स्वतंत्र केंद्राचा शोध सुरू होता. अखेर चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जिल्हाभरातून एकच विशेष केंद्र निश्चित झाले. सोमवारपासून या लसीचे डोज देणे सुरू होणार आहे.
१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा हा टप्पा २५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याकरिता जिल्हाभरात ६९ केंद्र तयार केले. सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोज वितरित करण्यात आले. १३ मार्चला पहिल्यांदाच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले. हीे लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज लागते. २ ते ८ अंश सेल्सियस तापमानातच ही लस साठवून ठेवता येते. केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व बाजुंची तपासणी केल्यानंतर चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ही लस टोचण्यासाठी प्रशासनाने नवीन स्वतंत्र केंद्र तयार केले.  
 

शुक्रवारपर्यंत ७३ हजार ३०४ जणांनी घेतला डोज 
जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर शुक्रवारपर्यंत ७३ हजार ३०४ जणांनी कोविड १९ प्रतिबंधक डोस घेतला. यामध्ये पहिला डोस घेणारे १३ हजार ७७ हेल्थ केअर वर्कर, दुसरा डोज घेणारे ९ हजार ९९६ फ्रन्ट लाईन वर्कर,  ३१ हजार ७४२ ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचा समावेश आहे.  

दोनही डोज एकाच केंद्रात
कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा बुस्टर डोज घेणे अत्यावश्यक आहे. कोविडशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोज याच लसीचा घ्यावा लागणार आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांनाही दुसरा बुस्टर डोज म्हणून हीच लस घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  
२४ हजार लस मिळणार
लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आले. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्य सरकारकडे पुन्हा कोविशिल्ड लसींची मागणी होती. सोमवारी जिल्ह्याला २४ हजार डोज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर २३ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. दररोज दीडहजार नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. केंद्रांची निश्चिती व अन्य सुविधा पूर्ण झाल्यानंतर लस वितरण केली जाणार आहे.
लसीकरणात चंद्र्रपूरची आघाडी
चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील आरोग्य विभागाचे केंद्र व खासगी हॉस्पिटल्स मिळून शुक्रवारपर्यंत १९ हजार ६४८ जणांनी लस टोचून घेतली. यामध्ये ८ हजार ५९७ व्यक्ती ६० वर्षे व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आहेत. चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातही ४ हजार ५२२ जणांची लस घेतली.

 

Web Title: The long awaited dose of 'Covacin' vaccine will be given in Chandrapur from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.